icc World cup : अफगाणिस्तानसमोर 180 धावांचं आव्हान; नेदरलँड्सचे ४ खेळाडू धावबाद

 

ब्युरो टीम : आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मधील 34 व्या सामन्यात अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाऱ्या नेदरलँड्सला पद्धतशीर गुंडाळलंय. अफगाणिस्तानने अफलातून फिल्डिंग करत नेदरलँड्सचं पॅकअप केलंय. नेदरलँड्सला आपल्या चुकांमुळे अफगाणिस्तानसमोर 50 ओव्हरही खेळता आलं नाही. अफगाणिस्तानने नेदरलँड्सला 46.3 ओव्हरमध्ये 179 धावांवर ऑलआऊट केलंय. त्यामुळे आता अफगाणिस्तानला वर्ल्ड कपमधील चौथ्या विजयासाठी 180 धावांची गरज आहे. आता नेदरलँड्स या 180 धावांचा यशस्वी बचाव करते की अफगाणिस्तान विजय मिळवते याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

नेदरलँड्सची बॅटिंग

नेदरलँड्सकडून सायब्रँड एंजेलब्रेक्ट याने 86 बॉलमध्ये 6 चौकारांच्या मदतीने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. मॅक्स ओडॉड याने 42 धावांचं योगदान दिलं. तर कॉलिन अकरमन याने 29 धावा केल्या. रोएलॉफ व्हॅन डर मर्वे याने 11 धावा जोडल्या. तर आर्यन दत्त 10 धावांवर नाबाद परतला. कॅप्टन स्कॉट एडवर्ड्स याला भोपळाही फोडता आला नाही. तर 5 जणांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. नेदरलँड्सचे 4 फलंदाज रन आऊट झाले. तर 1 जण स्टंपिग आऊट झाला.

अफगाणिस्तानकडून मोहम्मद नबी याने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या. तर नवीन उल हक याच्या जागी आलेल्या नूर अहमद याने 2 विकेट्स मिळवल्या. मुजीब उर रहमानच्या खात्यात 1 विकेट गेली. दरम्यान अफगाणिस्तानला सेमी फायनलमधील आव्हान कायम ठेवण्यासाठी नेदरलँड्स विरुद्ध विजय मिळवणं बंधनकारक आहे. त्यामुळे अफगाणिस्तान कशाप्रकारे या धावांचा पाठलाग करते हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.

अफगाणिस्तानने नेदरलँड्सला गुंडाळलं

नेदरलँड्स प्लेईंग ईलेव्हन | स्कॉट एडवर्ड्स (कॅप्टन आणि विकेटकीपर), वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओडॉड, कॉलिन अकरमन, सायब्रँड एंजेलब्रेक्ट, बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, आर्यन दत्त आणि पॉल व्हॅन मीकरेन.

अफगाणिस्तान प्लेईंग ईलेव्हन | हशमतुल्ला शाहिदी (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज, इब्राहिम झद्रान, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, इक्रम अलीखिल (विकेटकीपर), मोहम्मद नबी, रशीद खान, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी आणि नूर अहमद.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने