ब्युरो टीम : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 19 नोव्हेंबरला भारत-ऑस्ट्रेलियामध्ये ICC वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना होणार आहे. हा रोमांचक सामना पाहण्यासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासोबत देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हजर असतील. इतकच नाही, या सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एंथनी अल्बनीज आणि उप पंतप्रधान रिचर्ड मार्ल्स यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलं आहे. निमंत्रण स्वीकारुन ते सुद्धा फायनल पाहण्यासाठी येतील, अशी अपेक्षा आहे. अजूनपर्यंत दोघांकडून कंफर्मेशन आलेलं नाहीय. ऑस्ट्रेलियन टीम आठव्यांदा वर्ल्ड कप फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरेल, तेच टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये खेळणार आहे. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा तर टीम इंडियाने दोनवेळा वर्ल्ड कप जिंकलाय.
दोन दिवसांपूर्वीच टीम इंडियाने न्यूझीलंडला 70 धावांनी हरवून फायनलमध्ये प्रवेश केला. भारताने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 397 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंड टीमने 327 धावा केल्या. या मॅचमध्ये भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीने जलवा दाखवला. त्याने 9.5 ओव्हर्समध्ये 57 धावा देऊन 7 विकेट काढल्या.
ऑस्ट्रेलियाला शर्थ करावी लागली
दुसरा सेमीफायनल सामना ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळला गेला. गुरुवारी कोलकाताच्या इडन गार्डन्सवर ही मॅच झाली. दक्षिण आफ्रिकेने पहिली बॅटिंग केली. त्यांनी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 213 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने 7 विकेट गमावून 47.2 ओव्हर्समध्ये विजयी लक्ष्य गाठलं. हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला शर्थ करावी लागली. कारण दक्षिण आफ्रिकेने 174 धावांवर त्यांचे 6 विकेट काढले होते. पण कसाबसा ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला. आता फायनलमध्ये त्यांच्यासमोर टीम इंडियाच आव्हान आहे.
टिप्पणी पोस्ट करा