Indorikar maharaj ; उद्या कीर्तन म्हणून आजच कोर्टात हजेरी ; इंदोरीकर महाराजांची मागणी कोर्टाकडून मंजूर

 

ब्युरो टीम : अहमदनगर जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांना वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. इंदोरीकर महाराजांना संगमनेर न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. इंदोरीकर यांच्याविरोधात PCPNDT कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. इंदोरीकर यांनी अपत्य प्राप्तीबाबत एक वक्तव्य केलं होतं. तेच वक्तव्य त्यांना भोवलं होतं. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्यांना जामीन मिळणं कठीण होऊन बसलं होतं. अखेर आज त्यांना या प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे.

विशेष म्हणजे इंदोरीकर महाराज सुनावणीच्या एक दिवस आधीच स्वतः कोर्टात हजर राहीले आणि त्यांनी जामीन मिळवला. या प्रकरणावर 24 नोव्हेंबरला सुनावणी होईल, असं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर इंदोरीकर महाराजांनी 24 तारखेला इतर जिल्ह्यात नियोजित कीर्तन असल्याने कोर्टाला विनंती केली होती. त्यांची ही विनंती कोर्टाने मान्य केली. कोर्टाने इंदोरीकर महाराजांना 20 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर झाला. इंदोरीकर महाराजांचे वकील के. डी. धुमाळ यांनी याबाबत माहिती दिली.

नेमकं प्रकरण काय?

इंदोरीकर महाराज हे कीर्तनातून समाजाचं प्रबोधन करत असतात. ते आपल्या मिश्किल भाषेत समाजातील नकारात्मक गोष्टींवर निशाणा साधतात. या दरम्यान त्यांनी 2020 मध्ये आपल्या कीर्तनात पुत्र प्राप्तीबाबत एक वक्तव्य केलं होतं. त्यांच्या याच वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या प्रकरणी कोर्टात धाव घेतली होती.

सुरुवातीला इंदोरीकर महाराजांना स्थानिक कनिष्ट कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला होता. कोर्टाने इंदोरीकर महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर इंदोरीकर महाराजांनी सेशन कोर्टात धाव घेतली. सेशन कोर्टाने इंदोरीकर महाराजांना दिलासा दिला. सेशन कोर्टाने इंदोरीकर महाराजांवरील गुन्हा रद्दबातल ठरवला होता. पण सेशन कोर्टाच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात आव्हान देण्यात आलं.

हायकोर्टाने इंदोरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर इंदोरीकर महाराजांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली. पण सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निकाल कायम राखत या प्रकरणी संगमनेरच्या कोर्टात सुनावणी घेण्याचे आदेश दिले. कोर्टाने काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराजांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले होते. पण इंदोरीकर महाराज सुनावणीला हजर राहीले नाहीत. पोलिसांनी इंदोरीकर महाराजांची भेट न झाल्याने समन्स दिलं नाही, असं कोर्टात सांगितलं होतं. त्यानंतर अखेर आज इंदोरीकर महाराजांना दिलासा मिळाला आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने