Kartiki Ekadashi: कार्तिकी पूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा होणार ? जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली आंदोलकांची बैठक

 

ब्युरो टीम : कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना मराठा समाज आणि कोळी समाजाचा प्रचंड विरोध होतांना पाहायला मिळत असतानाच, आता हा विरोध मावळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर कार्तिकी महापूजेचा पेच आज संपण्याची शक्यता आहे. सोबतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महापूजा करण्याच्या निर्णय देखील आज होण्याची शक्यता आहे. यासाठी जिल्हाधिकारी आणि मराठा आंदोलक यांच्यात आज एक महत्वाची बैठक बोलवण्यात आली असून, यात सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. 

दरम्यान, आज होणाऱ्या बैठकीत मराठा आंदोलनाचा पेच सुटेल असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांना आहे. तसेच, मराठा समाजाबरोबर आदिवासी-कोळी समाजानेही उपमुख्यमंत्र्यांना पूजेपासून रोखण्याच्या घेतलेल्या भूमिकेवर रात्री जिल्हाधिकाऱ्यांनी कोळी समाजाच्या नेत्यांशी चर्चा केली आहे. त्यामुळे  कोळी समाज देखील आपल्या समाजाची बैठक घेऊन आपला निर्णय जाहीर करणार आहे. एकंदरीत आज दुपारपर्यंत मराठा आणि कोळी समाजाच्या विरोधावर यशस्वी तोडगा निघणार असून, गुरुवारी 23 नोव्हेंबर रोजी होणारी विठूरायाची महापूजा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मानाचा वारकरी एकत्रित करतील, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे. 

प्रशासनाची महत्वाची भूमिका...

कार्तिकी एकादशीच्या महापूजेला उपमुख्यमंत्र्यांना येऊ देणार नसल्याच्या भूमिकेतून मराठा आणि कोळी समाज आक्रमक झालेला असताना, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि पोलीस प्रशासनाने हा प्रश्न अतिशय शांतपणे हाताळले असल्याचे दिसत आहे. दरम्यान, आज दुपारी जिल्हाधिकारी आणि मराठा आंदोलक यांच्यात होणाऱ्या बैठकीत हा वाद संपण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्र्यांना महापूजा करण्यास विरोध होत असतांना मराठा समाजात फूट पडल्याचे चित्र होते. मात्र, काल रात्री उशिरा मराठा समाजातील दोन्ही गटांनी एकत्र येत चर्चा केली. तसेच, मराठा समाजाने आपापसातील मतभेद संपवत पुन्हा एकत्रितपणे एकसंघ समाजासमोर आल्याचे पाहायला मिळाले. तसेच, गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी हे वाद संपले असून, समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या आज दुपारी प्रशासनासमोर होणाऱ्या संभाव्य बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्यात येणार असल्याचे मराठा बांधवांकडून सांगण्यात आले. 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने