ब्युरो टीम : राज्याच्या राजकारणावर भाष्य करणारे अनेक चित्रपट आणि वेबसीरीज गेल्या काही दिवसांपूर्वी रिलीज झाले होते. त्यामध्ये, निवडणुकीचा धुरळा, सत्तासंघर्ष अशा अनेक मु्द्द्यांवर भाष्य करण्यात आले होते.
अशातच, गेल्या काही दिवसांपूर्वी ‘खुर्ची’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका कोण साकारणार?, याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर त्या प्रश्नाचं उत्तर चाहत्यांना मिळाले आहे. अभिनेता राकेश बापटने चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली आहे.
सत्तेसाठी खेळल्या जाणाऱ्या या लढाईमध्ये, राकेश बापट महत्वपूर्ण भूमिका साकारत असल्यामुळे सर्वांनाच चित्रपटाबद्दलची उत्सुकता आहे. आत्मनिर्भर, स्वबळाने आणि मुख्यत्वे बुद्धीचा वापर करून स्वतःच विश्व निर्माण करणाऱ्या राकेशच्या अभिनयाची अनेकदा चर्चा होते. आजवर राकेशने आपल्या अभिनयकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता पुन्हा एकदा राकेशमधील करारीपणा ‘खुर्ची’ या चित्रपटातून प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘खुर्ची’साठीची लढाई राकेश लढणार का? आणि चित्रपटातील सत्तेसाठीच्या या लढाईत राकेशला खुर्ची मिळणार का? हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. संतोष कुसुम हगवणे प्रस्तुत ‘आराध्या मोशन फिल्म्स’ आणि ‘योग आशा फिल्म्स’ निर्मित चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संतोष कुसुम हगवणे, योगिता गवळी आणि प्रदीप नत्थीसिंग नागर यांनी बरोबरीने सांभाळली आहे. चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद निर्माते संतोष कुसुम हगवणे असून दिग्दर्शन शिव धर्मराज माने आणि संतोष कुसुम हगवणे यांनी केले आहे.
चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत राकेश बापट, अक्षय वाघमारे, आर्यन हगवणे, सुरेश विश्वकर्मा, महेश घग, अभिनेत्री प्रीतम कांगणे, कल्याणी नंदकिशोर, श्रेया पासलकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपट पुढच्या वर्षी अर्थात १२ जानेवारी २०२४ रोजी थिएटर मध्ये प्रदर्शित होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा