ब्युरो टीम : मराठा आरक्षणाचा विषय राज्यात गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण फेटाळल्यानंतर विविध आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाचा प्रश्न मांडला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केल्यानंतर आरक्षणाचा विषयाची राज्यात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकार अॅक्सनमोडमध्ये आले. सरकारने विविध पातळ्यांवर हालचाली सुरु केल्या. आता छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी सरसावले आहे. आरक्षणासाठी संभाजीराजे यांनी थेट दिल्ली गाठली आहे. दिल्लीत जाऊन केंद्रीय मागासवर्ग आयोगात अयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची ते भेट घेणार आहेत. यावेळी कायदेशीर बाबींवर चर्चा होणार आहे.
दिल्लीत हालचाली वाढल्या
मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे मंगळवारी दिल्लीमध्ये दाखल झाले. मराठा आरक्षणासाठी हालचाली राज्यानंतर आता दिल्लीमध्ये सुरु झाल्या आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे व मराठा समाजाचे शिष्टमंडळ केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट घेणार आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रात सुरु ठेवलेल्या आंदोलनाला यश मिळविण्यासाठी त्यांचे हे प्रयत्न सुरु आहेत.
राज्य आयोगाशी केली होती चर्चा
नुकतेच छत्रपती संभाजीराजे व शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची भेट घेतली होती. मराठा समाजाला न्याय मिळावा, यासाठी सर्वस्तरावर संभाजीराजे प्रयत्न करत आहे. ते मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाठिशी दिसत आहेत. सोबतच कायदेशीर प्रक्रिया संभाजीराजे यांना माहिती असल्यामुळे ते विशेष पुढाकार घेताना दिसत आहेत. २८ नोव्हेबंर रोजी दुपारी ३ वाजता दिल्ली येथील केंद्रीय मागासवर्ग आयोगात अयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची ते भेट घेणार आहेत.
….तर मराठा आरक्षण निकाली
राष्ट्रवादी काँग्रेसने आमचे सरकार पाडले नसते, तर मराठा आरक्षणाचा प्रश्न तेव्हाच निकाली निघाला असता, असा दावा माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. मी मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात घेतलेल्या निर्णयामुळे राष्ट्रवादीने आमचे सरकार पाडले, असे त्यांनी म्हटले आहे. पुण्यातील पुरस्कार वितरण सोहळ्यात पृथ्वीराज चव्हाण यांनी हे विधान केले.
टिप्पणी पोस्ट करा