ब्युरो टीम : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा पंढरपुरातील मराठा आंदोलक आक्रमक झाले आहेत. कार्तिकी यात्रा नियोजनासाठी बोलावण्यात आलेली मंदिर समितीची बैठक उधळून लावण्याचा प्रयत्न केला. कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होवू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे.
पंढरपुरात आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकरयांच्या उपस्थितीमध्ये समिती सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. येथील भक्त निवासामध्ये मंदिर समितीची बैठक सुरु असतानाच राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्यासह मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत बैठकीत शिरले. बैठकीत घोषणाबाजी सुरू झाल्याने एकच गोंधळ उडाला.
दरवर्षी आषाढीची शासकीय महापूजा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तर कार्तिकीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते केली जाते. यावेळी राज्याला प्रथमच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या रूपाने दोन उपमुख्यमंत्री मिळाले आहेत.
यापैकी कोणाला शासकीय महापूजेचे निमंत्रण द्यायचे यावरून मंदिर समितीपुढे पेच निर्माण झालेला असतानाच मराठा क्रांती मोर्चाने कार्तिकी एकादशीची उप मुख्यमंत्र्याच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा करण्यास विरोध दर्शवला आहे. त्यामुळे कार्तिकीची विठ्ठलाची महापूजे बाबत वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर मंदिर समितीने शासकीय महापूजेचे उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण देवू नये, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.
यापूर्वी 2018 साली आरक्षणाच्या मागणीसाठी रामभाऊ गायकवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आषाढीच्या शासकीय महापूजेला विरोध केला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरला न येता शासकीय वर्षा निवासस्थानी विठ्ठलाची केली होती. त्यानंतर याच मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलकांनी उपमुख्यमंत्र्या हस्ते होणा-या महापूजेला विरोध केला आहे.
दरम्यान मराठा समाजाच्या इशाऱ्यानंतर विधी व न्याय खात्याला कळवण्यात येईल. शासनाकडून येणाऱ्या सुचने नुसार निर्णय घेतला जाईल अशी स्पष्ट भूमिका मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी स्पष्ट केले.
सध्याचे आंदोलनाचे स्वरूप बघता वारकऱ्याच्या हस्ते शासकीय महापूजा होऊ शकते असं सूचक विधान औसेकर महाराजांनी केले आहे. मराठा आरक्षण आंदोलकांच्या विरोधा नंतर कार्तिकीची महापूजा कोण करणार याकडेच वारक-यांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा