ब्युरो टीम : सध्या देशात पाच राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून या निवडणुकीकडे पाहिलं जात आहे. आज राजस्था विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे, राजस्थानात विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. राजस्थानात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. राजस्थानचा मागच्या काही वर्षातील राजकीय इतिहास पाहिला, तर इथल्या मतदारांनी आलटून-पालटून कौल दिला आहे. कुठल्याही एका पक्षाला सलग दोन टर्म सत्ता मिळालेली नाही. यावेळी हा पॅटर्न बदलतो का? याकडे राजकीय विश्लेषकांच लक्ष आहे. राजस्थानात सध्या काँग्रेसच्या अशोक गेहलोत यांचं सरकार आहे. निवडणुकीआधी त्यांनी मतदारांवर योजनांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे मतदार कोणाला साथ देतात? याची उत्सुक्ता आहे.
राजस्थानात मागच्या काही वर्षांपासून वसुंधरा राजे भाजपाचा चेहरा राहिल्या आहेत. त्यांनी भाजपाकडून मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेतेपद भूषवलं आहे. मतदारांनी कौल दिल्यास भाजपा पुन्हा त्यांनाच संधी देणार की, नवीन चेहरा आणणार याची सुद्धा उत्सुक्ता आहे. आज राजस्थानात मतदानासाठी कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट, वसुंधरा राजेसह 1862 उमेदवारांच भवितव्य मतपेटील बंद होणार आहे. भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी जोरदार प्रचार केला आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात रॅली, सभांना संबोधित केलं आहे. राजस्थान विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.
200 जागा, मग मतदान 199 जागांसाठी का?
राजस्थानमध्ये विधानसभेच्या एकूण 200 जागा आहेत. पण आज 199 जागांसाठी मतदान यासाठी होत आहे, कारण श्रीगंगानगरच्या करणपूर सीटवरुन काँग्रेस उमेदवार गुरमीत सिंह कूनर यांचं निधन झालं. राजस्थानात एकूण 5,25,38,105 मतदार आहेत. यात 1862 उमेदवारांच्या भवितव्यांचा फैसला आज होईल.
टिप्पणी पोस्ट करा