Rashmika Mandhana : रश्मिका मंदाना करतेय ७ वर्ष मोठ्या अभिनेत्याला डेट ? सहकलाकारांने केली पोलखोल

 

ब्युरो टीम : नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना सध्या तिच्या ‘ॲनिमल’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात ती पहिल्यांदाच रणबीर कपूरसोबत काम करतेय. रणबीर आणि रश्मिकाची नवीन जोडी मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेसुद्धा उत्सुक आहेत. नुकतेच हे दोघं चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नंदमुरी बालकृष्ण यांच्या ‘अनस्टॉपेबल विथ NBK 2’ या चॅट शोमध्ये उपस्थित होते. यावेळी रणबीर आणि रश्मिकासोबत चित्रपटाचा दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगासुद्धा होता. या चॅट शोमध्ये गप्पा मारताना रणबीरने रश्मिकाच्या रिलेशनशिपची पोलखोल केली.

शोमध्ये बालकृष्ण यांनी स्क्रीनवर संदीप रेड्डी वांगा यांचा पहिला चित्रपट ‘अर्जुन रेड्डी’ आणि आताचा ‘ॲनिमल’ या दोन्ही चित्रपटांचे पोस्टर एकत्र दाखवले. त्यावर रणबीर म्हणाला की रश्मिकाला हे विचारलं पाहिजे की दोघांपैकी तिचा आवडता अभिनेता कोण आहे? मी की विजय देवरकोंडा? रश्मिका या प्रश्नाचं उत्तर देताना म्हणाली, “अर्जुन रेड्डीशी माझं कनेक्शन आहे. तर दुसरीकडे ॲनिमल माझा चित्रपट आहे. त्यामुळे दोघं माझे आवडते कलाकार आहेत.” हे ऐकल्यानंतर रश्मिकाला विचारलं जातं की “अर्जुन रेड्डीशी तिचं काय कनेक्शन आहे?”

आपल्याला जाणुनबुजून हा प्रश्न विचारला जातोय, हे रश्मिकाला एव्हाना समजतं. मात्र तरीही ती त्यावर पटणारं उत्तर देऊ शकत नाही. “हैदराबाद गेल्यानंतर मी पाहिलेला पहिला चित्रपट हा अर्जुन रेड्डीच होता”, असं ती म्हणाली. हे उत्तर ऐकल्यानंतर रणबीर तिची पोलखोल करतो. “संदीप हे रश्मिकाला अर्जुन रेड्डीच्या सक्सेस पार्टीत भेटले होते. ही पार्टी विजयच्या टेरेसवर होत होती”, असं तो म्हणतो. रणबीरच्या तोंडून हे ऐकल्यानंतर रश्मिकाला आश्चर्याचा धक्का बसतो आणि ती त्याला विचारते, “तुला ही सर्व माहिती कोण देतंय?” या चॅट शोमध्ये विजय देवरकोंडाला कॉलसुद्धा केला गेला. रश्मिका आणि विजय यांच्यातील संवाद ऐकल्यानंतर दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय, याची खात्री प्रेक्षकांना झाली.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर रश्मिकाने बॉलिवूडकडे आपला मोर्चा वळविला. कमी वयात तिने प्रसिद्धी आणि पैसा दोन्ही कमावले. चित्रपटांसोबतच रश्मिका तिच्या खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत आली. विजय देवरकोंडासोबत तिचं नाव जोडलं जात असलं तरी तिचा आधी साखरपुडा झाला होता, हे फार कमी लोकांना माहीत असेल. रश्मिकाने दाक्षिणात्य अभिनेता आणि निर्माता रक्षित शेट्टीशी साखरपुडा केला होता. मात्र 2017 मध्ये या दोघांचा साखरपुडा मोडला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने