ब्युरो टीम : छगन भुजबळ हे भाजपच्याजवळ म्हणजे देवेंद्र फडवणीसच्या जवळ गेले आहेत. देवेंद्र फडवणीस यांनी अनेक वेळा आश्वासने दिलेली आहेत. ती कधीच पूर्ण झालेली नाहीत. 2015 ला मराठवाड्याला 2 हजार कोटीचा पॅकेज देऊ केलं होतं. त्याचा एक रुपया सुद्धा मराठवाड्याला मिळालेला नाही. धनगर आरक्षणाचा मुद्दा पहिल्या अधिवेशनात सोडू असं ते म्हणाले होते. तोही सोडवला नाही. म्हणूनचभुजबळ हे कधीही खरं न बोलणाऱ्या नेत्याच्या जवळ गेले आहेत हे मी म्हणतो त्यात तथ्य आहे. अशा नेत्यांसोबत राहूनच भुजबळ यांनाही ती सवय लागलेली असावी, असा चिमटा काढतानाच छगन भुजबळ यांनी पुरोगामी विचार सोडले आहेत. नवीन विचारामुळे त्यांना खोटे बोलण्याची सवय लागली असावी, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी लगावला आहे.
महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं होतं. त्यावरूनही त्यांनी टोलेबाजी केली. महायुतीच्या आघाडीच्या जागेचा फॉर्म्युला ठरला आहे. मात्र शिंदे गटाला किती आणि अजितदादाच्या गटाला किती जागा मिळणार हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. हे जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा आज काय जे भांडणं सुरू आहेत. त्यापेक्षा अधिक भांडणं होतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. महाविकास आघाडीमध्येही सगळ्या जागांची चाचपणी सुरू आहे. जयंत पाटील, सुप्रियाताई सुळे, उद्धव ठाकरे, नाना पटोले हे जे निर्णय घेतील ते आम्हाला महाविकास आघाडी म्हणून योग्य असेल. फक्त जिल्हाप्रमुख , तालुकाप्रमुखांना विश्वासात घेऊन निष्ठावंत लोकांना संधी दिली पाहिजे, असं सगळ्यांचं मत आहे, असंही ते म्हणाले.
अहंकार आहे, अहंकार
रोहित पवार यांनी यावेळी आशिष शेलार यांच्यावरही हल्ला चढवला. शेलार यांचा अहंकार आहे. केंद्रात आणि राज्यात त्यांचं सरकार आहे. त्यामुळे त्यांना अहंकार येणारच. 2019 च्या निवडणुकीत कुणी तरी मी पुन्हा येईल असं म्हटलं होतं. आता त्यांच्यातीलच नेता अहंकार दाखवत आहे. त्यांनी त्यांचा अहंकार दाखवावा. आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करू. लोकांना विश्वासात घेऊन येणाऱ्या इलेक्शनमध्ये आम्ही लढू. जेव्हा ते सर्वजण विरोधी पक्षात जातील तेव्हा लोणचं कोण खाते ते बघूया, असं टोला रोहित पवार यांनी आशिष शेलार यांना लगावला.
तेव्हा पोलीस कुठे होते?
मराठा आणि ओबीसी समाजातील संघर्षावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. हा सर्व सामान्यांचा संघर्ष नाही. कोल्हापुरात हिंदू – मुस्लिम करण्याचा प्रयत्न झाला. त्याला यश आलं नाही. लोकसभा जिंकायची असेलतर मराठा-ओबीसी करून जिंकता येईल असं काही नेत्यांचं मत असावं. बीडमध्ये जो हिंसाचार झाला. त्यात प्रोफेशनल लोकांचा वापर केला होता. गुंडांचा वापर केला होता. पेट्रोल बॉम्ब आणि फॉस्फरस बॉम्ब आदी साहित्याचा वापर करण्यात आला होता. संदीप क्षीरसागर यांच्या घरासमोर बीड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांचं कार्यालय आहे. त्या ठिकाणी 200 ते 250 पोलीस तैनात असतात. जेव्हा क्षीरसागर यांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा पोलीस काय करत होते? असा सवाल त्यांनी केला.
टिप्पणी पोस्ट करा