Sambhaji Chatrpati : मराठा आरक्षणाला बळ देणं ही आमची जबाबदारी; संभाजी छत्रपतींनी घेतली जरांगे पाटलांची भेट

 

ब्युरो टीम :  खासदार संभाजीराजे छत्रपती मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला गेले. छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात मनोज जरांगे यांच्यावर उपचार सुरु आहेत. संभाजीराजे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी त्यांनी जरांगेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांशीसुद्धा चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी पत्रकारांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला का? असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी हो, निश्चितच दबाव वाढला. तसेच हा दबाव आणखी वाढवण्यासाठी आपण जरांगेंच्या भेटीसाठी आल्याचं संभाजीराजे म्हणाले.



मनोज जरांगे यांचा सरकारवर दबाव निर्माण झालाय का? असा प्रश्न संभाजीराजेंना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “हो, असणारच ना. म्हणूनच तर तुम्ही माझा बाईट घेण्यासाठी एवढा वेळ थांबला आहात ना? दबाव आहे म्हणूनच आहे. आणखी दबाव टाकण्यासाठी मी आलोय ना, मनोज यांना बळ देण्यासाठी मी आलोय. म्हणजे डबल दबाव”, असं संभाजीराजे म्हणाले. यावेळी संभाजीराजेंना मनोज जरांगेंनी दिलेला वेळ सरकार पाळेल का? असा सवाल संभाजीराजेंना विचारण्यात आला. त्यावर संभाजीराजेंनी “मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आहे का? मी कॅबिनेटमध्ये आहे का? आमचं वेगळं आहे ते म्हणजे स्वराज्य. ते यांच्यात काही मिसळत नाही”, असं उत्तर दिलं.

जरांगेंच्या प्रकृतीत सुधारणा

“मनोज जरांगे यांच्या पुढच्या लढ्यासाठी, त्यांना बळ देण्यासाठी मी इथे आलो. मला आनंदाने सांगायचं आहे की, त्यांची रिकव्हरी चांगली आहे. डॉक्टरांनी काल जी लिव्हर आणि किडनीला सूज सांगितली होती, ती आज कमी झालेली आहे. त्यांना लवकरात लवकर डिस्चार्ज घेण्यापेक्षा मी सांगितलं आहे की, जास्तीत जास्त दिवस त्यांना इथे ठेवावं. पूर्ण रिकवर झाल्याशिवाय त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज करु नये. हॉस्पिटलमध्ये सुद्धा शिस्त असावी, जेणेकरुन कमीत कमी लोकं त्यांना भेटावीत. शक्यतो भेटूच नयेत, असा मी त्यांना सल्ला दिलेला आहे”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.

“मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेल्या तारखेवरुन गोंधळ आहे. पण माझ्यासाठी ते मुद्दे फार छोटे आहेत. सगळे मंत्री महोदय इथे येतील. तो फार मोठा विषय नाही. दोघांच्या समन्वयाने त्यावर निर्णय घेतला जाईल. शासनानेसुद्धा आज सकाळी जीआर दिलेला आहे. माझी भूमिका काय ते मी पूर्वीच स्पष्ट केली आहे. परत-परत सांगणं ते उचित मानत नाही. गरीब मराठ्यांना न्याय मिळावा, एवढंच माझं म्हणणं आहे. त्या दृष्टीकोनातून मनोज जरांगे सविस्तर या विषयावर बोलतील”, असं संभाजीराजे म्हणाले.

‘मनोज जरांगेंच्या मागण्या पूर्ण होतील’

“सरकारशी किती बोलायचं आणि किती भेटायचं? हे सरकार असूद्या किंवा मागचं सरकार असूद्या. मी तर 2007 पासून सांगतोय की, समाजाला कसा न्याय देता येईल. पण मनोज जरांगे यांच्या माध्यमातून जो लढा उभा राहिलेला आहे, समाजसुद्धा त्यांच्याकडे एका विश्वासाने पाहतो. त्यांची तब्येत चांगली असावी, यासाठी मी आलोय. मला सुद्धा पूर्ण विश्वास आहे, निश्चितपणे मनोज जरांगे पाटील यांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या पूर्ण होतील”, असं संभाजीराजे म्हणाले.

“आपल्या जीवापेक्षा आपला समाज मोठा असतो. समाजासाठी जो वेळ देतो अशा लोकांना ताकद देण्यासाठी, अशा मंडळींना बळ देण्यासाठी ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे मी सुरुवातीलासुद्धा आलो होतो. उपोषण चालू असताना सुद्धा आलो होतो”, अशी प्रतिक्रिया संभाजीराजेंनी दिली.

‘सगळ्यांनी वाट पाहणं गरजेचं’

“मनोज जरांगे यांनी वेळ दिलेला आहे. तज्ज्ञ लोकं इथे आले होते. मला वाटतं योग्य मार्गावर आहे. योग्य निर्णय होईल. मनोज जरांगे यांना विषय पटला. त्यांनी त्यासाठी काही दिवसांचा वेळ दिलाय. मुख्यमंत्र्यांचं सुद्धा युद्ध पातळीवर काम सुरु आहे. सरकारने आणि त्यांच्या टीमने वेळ दिला तर आपणसुद्धा सगळ्यांनी वाट पाहणं गरजेचं आहे. मी जीआर काय काढलाय ते पाहिलेलं नाही. मी काहीतरी स्टेटमेंट करण्यापेक्षा, मनोज जरांगे यांनी लढा उभा केलाय. ते यावर सविस्तर बोलतील”, असं संभाजीराजे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने