Sharad Pawar ;याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी टीका केली नाही”; शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका;

 

 

ब्युरो टीम :  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. ते सोलापुरात बोलत होते. सोलापुरात शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला शरद पवारांनी हजेरी लावली. या कार्यक्रमात शरद पवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. केंद्राचं शेतकऱ्यांबद्दल असलेल्या धोरणावर त्यांनी भाष्य केलं. तसेच आपण कृषीमंत्री असताना तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यवतमाळमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी घेऊन गेलो होतो, अशी आठवण त्यांनी सांगितली.


“सध्या मी कुठेच नाही. पण त्याची काळजी करू नका. मी कुठेच नसलो तरी सगळीकडे असतो. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापूरला आल्यावर मला म्हणाले की, शरद पवारांना काय समजते. पण लोकानी त्यांच्या उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे लोकांना हे समजते की काय करायचे?”, असा टोला शरद पवारांनी लगावला.

“मी कृषीमंत्री असताना यवतमाळमध्ये आत्महत्या झाल्या. त्यानंतर मी तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना यवतमाळला नेले आणि आत्महत्या केलेल्या कुटुंबीयांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर लक्षात आलं की, शेतकऱ्याने कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केली. त्यानंतर आम्ही देशातील उद्योजकांचे थकीत कर्ज वसुली सुरु केली आणि देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

शरद पवारांची नरेंद्र मोदींवर टीका

“मी जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते इंदिरा गांधी यांच्यापर्यंत सर्व पंतप्रधान यांची भाषणे ऐकली. मात्र नरेंद्र मोदी ज्याप्रमाणे स्थानिक मुख्यमंत्र्यांवर टीका करतात हे चुकीचं आहे. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी अशी टीका केली नाही”, अशी टीका शरद पवारांनी केली.

अजित पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया

शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीवर देखील प्रतिक्रिया दिली. दिवाळीच्या निमित्ताने दोन्ही काका-पुतणे एकत्र आले होते. याबाबत शरद पवारांनी भूमिका मांडली. “एकत्र दिवाळी करणे ही आमची अनेक वर्षाची परंपरा आहे. या भेटीत कोणताही राजकीय लवलेश नव्हता, मात्र मीडियाला बातमी लागते”, असं शरद पवार म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने