ब्युरो टीम : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर आज महत्त्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची फेरसाक्ष नोंदवण्यात आली. सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेच्या दरम्यान ही सुनावणी दोन सत्रात पार पडली. या दोन्ही सत्रात सुनील प्रभू यांची फेर तपासणी करण्यात आली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांना व्हीपच्या मुद्द्यावरुन प्रचंड प्रश्न विचारले. महेश जेठमलानी यांनी प्रश्न विचारुन सुनील प्रभू यांना घेरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुनील प्रभू यांनी दिलेल्या काही उत्तरांवर जेठमलानी यांनी आक्षेप नोंदवला. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुनील प्रभू यांना विचारलेल्या प्रश्नांची थेट उत्तर द्या, असा आदेश केला. त्यावर सुनील प्रभू यांनी जेठमलानी आपल्याला फिरवून प्रश्न विचारत आहेत. त्यांनी हवे तेच महत्त्वाचे प्रश्न विचारावेत. मला त्यांच्या प्रश्नांपासून संरक्षण द्या, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांकडे केली.
नेमकं संभाषण काय झालं?
जेठमलानी – 21 जून 2021 रोजी जारी कथितरित्या जारी केलेल्या व्हीपवर आपली स्वाक्षरी आहे का?
सुनील प्रभू – इथे माझं नाव लिहिलं आहे. मग ती सही माझीच असणार ना? ही माझीच सही आहे. माझी खोटी सही कोण करेल?
जेठमलानी – 21 जूनला जारी केलेल्या व्हीपवर केलेली स्वाक्षरी आणि प्रतिज्ञा पत्रावर केलेली स्वाक्षरी ही वेगळी दिसतीय. आपल्या दोन स्वाक्षरी आहेत का?
प्रभू – हो, माझ्या दोन सह्या आहेत. सही मी पूर्ण करताना S W Prabhu अशी करतो आणि शॉर्टमध्ये करताना SP अशी सही करतो. मी विधिमंडळ सदस्य आणि व्हीप म्हणून आतापर्यंत ज्या सह्या केल्या आहेत त्या सारख्या आहेत.
जेठमलानी – 21 जून 2022 आधी आपण किती लिखित व्हीप जारी केले आहेत ?
प्रभू – मला जे स्मरणात आहे त्यानुसार या कार्यकाळात दोन निवडणूका लागल्या. एक राज्यसभेची आणि एक विधान परिषदेची. दोन्ही निवडणुकीचे व्हीप मी यापूर्वी जारी केले आहेत.
जेठमलानी – आपण मूळ व्हीप जो सादर केला त्यापूर्वी त्या व्हिपचा ताबा कोणाकडे होता?
प्रभू – मूळ व्हीप म्हणजे कोणता व्हीप मला कळलं नाही? मी यासंदर्भातील कागदपत्र पक्षाच्या कार्यालयात ज्या जागेवर ठेवतो, त्या ठिकाणी हे सगळे ठेवले होते (विधान सभेच्या पक्ष कार्यालयात नाही)
जेठमलानी – 20 तारखेला झालेल्या निवडणुकांमध्ये सगळ्या आमदारांनी मतदान केलं होतं का?
प्रभू – हो सगळ्यांनी मतदान केलं
जेठमलानी – जर सगळ्यांनी मतदान केलं तर कोण मिसिंग होतं आणि कधीपासून ते मिसिंग झाले?
प्रभू – शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं. याची पडताळणी करण्यासाठी तुम्ही विधानसभेच्या पटलावरचे रेकॉर्ड मागवू शकता.
महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभूंच्या उत्तरांवर आक्षेप घेतला.
जेठमलानी – प्रभू वेळ वाया घालवत आहेत. मी मुद्दाम विचारलेल्या प्रश्नांची गोल-गोल ऊत्तरे देत आहेत. माझा यावर आक्षेप आहे
(जेठमलानी यांनी माझं मत रेकामर्डवर घ्यावं, अशी विनंती अध्यक्षांना केली. त्यानंतर जेठमलानी यांचं स्टेटमेंट रेकॉर्डवर घेण्यात आलं)
प्रभू – अध्यक्ष मोहोदय हे खरं नाहीये
जेठमलानी – उद्धव ठाकरे यांनी सूचना केल्यानंतर व्हीप बजावण्यात आलेले डॉक्युमेंट हेच आहेत का ?
प्रभू – उद्धव ठाकरे यांनी आमदार मिसिंग असल्याचे कळताच बैठकीसाठी बोलविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मी हा व्हीप सर्व आमदारांना बजावला होता.
जेठमलानी – 20 जूनला झालेल्या सर्व शिवसेना पक्षाच्या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान केले होते का?
प्रभू – सर्व शिवसेना आमदारांनी मतदान केले होते
जेठमलानी – जर 20 जूनला सर्व शिवसेना विधानसभा आमदारांनी विधानपरिषद निवडणुकीत मतदान केले तर ते कोणते आमदार मिसिंग होते असं तुम्ही म्हणताय?
प्रभू – सर्व शिवसेना आमादारांनी मतदान केले होते. हे जर चेक करायचं असेल तर विधानभवनाच्या पटलावर हे दिसून येईल. विधानपरिषद निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वृत्तवाहिन्यांवर बातम्या येत होत्या की शिवसेनेचे काही आमदार मिसिंग आहेत. त्यानंतर संपर्क करण्याचा प्रयत्न केल्यावर बऱ्याच आमदारांचे फोन बंद होते. त्यानंतर सातत्याने मीडियामध्ये हे आमदार गुजरात दिशेने गेल्याच्या बातम्या येत होत्या
जेठमलानी – मी स्पेसिफिक विचारत आहे की कुठले आमदार मिसिंग होते? हे सगळं सांगायची गरज नाही.
प्रभू – मला समोरून एवढे प्रश्न विचारले जातात की त्याचं मला संक्षिप्त उत्तर द्यावं लागत आहे.
विधानसभा अध्यक्ष – तुम्ही स्पेसिफिक बोलत नाहीत
प्रभू – मला संरक्षण द्या, समोरून ऊलट प्रश्न येत आहेत मी काय करू? तुम्ही म्हणाल तर मी हो किंवा नाहीमध्ये ऊत्तर देतो.
अध्यक्ष – तुम्ही प्रभू आम्हाला सांगा की मिसिंग झालेले आमदार कोण होते? असा प्रश्न त्यांनी विचारला. तुम्ही म्हणताय की आमदार मिसिंगच्या बातम्या कानावर येत होत्या.
प्रभू – मी ज्यांना हातोहात व्हीप द्यायला लावले जे मुंबईत उपस्थित होते. ज्यांचे फोन लागत नव्हते ते मिसिंग होते. त्यांना व्हीप पाठविणे आवश्यक होते. रात्रीपासून ते बैठकीपर्यत मी व्हीप देण्याचा प्रयत्न करत होतो.
अध्यक्ष – कामत आपले आमदार खूप मोठे उत्तर देत आहेत, ज्याचा मूळ प्रश्नांशी संबंध येत नाही. त्यांनी जर स्पेसिफिक उत्तर दिली तर वेळ जास्त लागणार नाही.
प्रभू – जर मला समोरचे वकील इतके उपप्रश्न विचारात असतील तर मला संक्षिप्त उत्तरे द्यावे लागतील. त्यामुळे यातून मला संरक्षण द्या! त्यांनी एवढे उपप्रश्न केले आहेत, त्यामुळे मला असे उत्तर द्यावी लागणार
‘व्हिप जाहीर झाला नाही, असं एक नरेटीव्ह सेट करण्याचे प्रयत्न सुरु’
ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी सुनावणीनंतर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी वकील महेश जेठमलांनी प्रश्नांचा भडीमार करत आहेत, असं म्हटलं. “मला एक स्पष्ट सांगायचंय की, महेश जेठमलानी हे ज्या पद्धतीने प्रश्नांचा भडीमार करत आहेत, एका मागे एक प्रश्न ते विचारत आहेत, त्यामुळे त्यांचे स्पेसिफिक उत्तर सुनील प्रभू यांच्याकडून दिली जात आहेत. यामध्ये वेळ जात आहे. हे त्यांना सुद्धा कळायला हवं”, असं असीम सरोदे म्हणाले.
“सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढल्यानंतर आता ते सध्या व्यवस्थित काम करत आहेत. उद्या देखील सुनील प्रभू यांचीच फेरसाक्ष तपासली जाईल. व्हिप जाहीर झाला नाही, असं एक नरेटीव्ह सेट करण्याचे काम जेठमलानींकडून सुरू आहे. पण आम्हाला वाटतं की सुनील प्रभू ज्या पद्धतीनं उत्तर देत आहेत त्यामुळे त्यांचा हा दावा फोल ठरेल”, अशी प्रतिक्रिया वकील असीम सरोदे यांनी दिली.
टिप्पणी पोस्ट करा