World Cup 2023 : वर्ल्ड कप फायनलमध्ये प्रेक्षकांना मिळणार खास मेजवानी; सामान्या अगोदर होणार वेगवेगळे कार्यक्रम

 

ब्युरो टीम : मुंबईत सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडचा पराभव करून भारताने वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केल्याने संपूर्ण देशात क्रिकेटची क्रेझ शिगेला पोहोचली आहे. एकीकडे फायनल मॅचच्या दिवशी म्हणजेच रविवारी एका रात्रीसाठी पंचतारांकित हॉटेलांचे एका खोलीचे दर दोन लाख रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. तर साध्यासुध्या लॉज, हॉटेलांनीही आपल्या दरांत पाच ते सात पटीने वाढ केली आहे. अंतिम सामन्याबद्दल भारतातच नाही, तर ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, दुबईतही उत्साहाचं वातावरण असून तिथूनही काही क्रिकेटप्रेमी येण्याची शक्यत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मॅचसोबतच चाहत्यांना स्टेडियममध्ये इतरही काही शोज पहायला मिळणार आहेत.

आयसीसी आणि बीसीसीआयने याबाबतची माहिती दिली आहे की मॅचच्या आधी, ड्रिंक्स ब्रेकदरम्यान, इनिंग ब्रेकदरम्यान आणि दुसऱ्या इनिंगच्या ड्रिंक्स ब्रेकदरम्यान वेगवेगळे शोज दाखवण्यात येणार आहेत. वर्ल्ड कपच्या मॅचच्या आधी एक एअर शो होणार आहे. त्याला सूर्यकिरण एअर शो, असं नाव देण्यात आलं आहे. इंडियन एअरफोर्सने या शोचं आयोजन केलं आहे. त्यासाठी दुपारी 1.30 पासून 1.50 ची वेळ देण्यात आली आहे. त्याआधी टॉस होणार आहे. एअर शो नंतर दोन्ही टीमचे राष्ट्रगीत होतील. नंतर दोन वाजता सामन्याची सुरुवात होईल.


भारतीय वायुसेनेद्वारा आकाशात पहिल्यांदा सलामी दिली जाईल. त्यानंतर 10 मिनिटांचा एअर शो दाखवण्यात येईल. आशियात पहिल्यांदाच अशा पद्धतीचा शो एखाद्या क्रिकेट मॅचसाठी केला जातोय. यासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. पहिल्या इनिंगमधील ड्रिंक्स ब्रेकदरम्यान ‘खलासी’ या ट्रेंडिंग गाण्याचा गायक आदित्य गधवी परफॉर्म करणार आहे. जवळपास दुपारी 3 वाजता हा शो होईल. तर ब्रेकदरम्यान प्रीतम, जोनिता गांधी, नक्श अजीज, अमित मिश्रा, अकासा सिंह आणि तुषार जोशी यांचेही परफॉर्मन्स पहायला मिळतील. देवा देवा, केसरियाँ, लेहरा दो, जीतेगा जीतेगा, नगाडा नगाडा, धूम मचाले, दंगल, दिल जश्न बोले यांसारखी दमदार गाणी सादर केली जातील.

मॅचच्या दुसऱ्या इनिंगच्या ड्रिंक्स ब्रेकदरम्यान लेजर आणि लाइट शो होणार आहेत. यासाठीची तयारी सुरू असून आज (शनिवार) त्याला अंतिम रुप देण्यात येईल. वर्ल्ड कप 2023 मध्ये पहिल्यांदा लेझर शो होणार आहे. मॅच झाल्यानंतर चॅम्पियन्सला सलामी देण्यासाठी ड्रोन शो आयोजित करण्यात आला आहे. यासाठी तब्बल 1200 ड्रोन वापरण्यात येणार आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने