World Cup 2023 : पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर मोहम्मद शमी व जडेजाचं ट्विट, म्हणाले...



ब्युरो टीम : अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत भारताला पराभव स्वीकारावा लागला. आस्ट्रेलियानं भारतीय संघाला पराभवाची धूळ चारत वर्ल्ड कपवर सहाव्यांदा नाव कोरलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील मैदानात हा सामना पाहण्यासाठी दाखल झाले होते. मात्र, या सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर मोदी यांनी अशी काही कृती केली, ज्याचे आता कौतुक होत आहे.

भारतीय संघाने सामना गमावला असला तरीही त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट खेळाडूंचं ड्रेसिंग रुम गाठलं. तिथं उपस्थित असलेल्या आणि नाराज-दुःखी झालेल्या खेळाडूंच्या कामगिरीचं कौतुक करून त्यांना हस्तांदोलन केलं. याबाबतची X पोस्ट टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आणि ऑलराऊंडर खेळाडू रवींद्र जडेजा यांनी केली असून पंतप्रधानांचे आभार मानले आहेत. 

काय आहे मोहम्मद शमीची पोस्ट

“दुर्दैवाने कालचा आमचा दिवस नव्हता. पण मला आणि आमच्या संघाला पाठिंबा दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही आभार. ड्रेसिंग रुममध्ये येऊन त्यांनी आमचं मनोबल वाढवलं. आम्ही पुन्हा लढू!” अशी पोस्ट मोहम्मद शमीने केली आहे.

रविंद्र जडेजा म्हणतो...

रविंद्र जडेजाने त्याच्या X अकाउंटवरून पोस्ट करून त्यात म्हटले आहे की, “आपल्याकडे चांगली स्पर्धा झाली, पण आम्ही काल कमी पडलो. आम्ही सर्व दुःखी आहोत. पण तरीही आम्हाला लोकांचा पाठिंबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल ड्रेसिंग रुमला भेट दिली. या भेटीत त्यांनी खेळाडूंना प्रेरणा दिली”, अशी पोस्ट रविंद्र जडेजाने केली आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदी रविंद्र जडेजाशी हस्तांदोलन करताना दिसत आहेत.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने