ब्युरो टीम : १ डिसेंबर २०२३ –‘1 डिसेंबर-जागतिक एड्स दिन’ हा जगभरातील एचआयव्ही/ एड्स संबंधित आजारांमुळे तसेच एचआयव्ही विरुद्ध च्या लढ्यात आपले मोलाचे योगदान देऊन जीव गमावलेल्या लोकांच्या स्मरणार्थ आणि एचआयव्ही संसर्गितांना पाठिंबा व समर्थन दर्शवण्यासाठी साजरा करण्याचा दिवस. चार दशकांचा काळ लोटला तरी आजही एचआयव्ही संसर्गित लोकांना उपेक्षित मानले जाते. समाजाकडून मिळणारे असहकार आणि वाईट वागणूक यामुळे अनेकांना सुखी जीवन जगताही येत नाही. समाजात त्यांना मानाचं स्थानही मिळत नाही.
एचआयव्ही संसर्ग ही केवळ वैद्यकीय समस्या नसून त्याची आर्थिक, सामाजिक आणि राजकीय अशा सर्व घटकांशी खोलवर गुंफण आहे. ज्यामध्ये राजकीय सहभाग सर्वसमावेशक रणनीती तयार करून धोरणात्मक बदल करणे, संसाधनांचे वाटप करणे हा आहे. आजतागायत एचआयव्ही कार्यक्रमांत बरेच सकारात्मक बदल झाले असले तरीही हे बदल होत असताना समुदायाची प्रतिबद्धता व सक्रिय सहभाग असल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे, ज्याचा परिणाम आज आपल्याला एचआयव्ही च्या संसर्गाला नियंत्रणात आणण्यात तसेच दिसून येतो. परंतू,आजही एचआयव्ही संसर्गित व्यक्ती त्यांच्या कुटुंबातील सदस्यांबरोबर 'कलंक आणि भेदभाव' हे एचआयव्ही प्रतिबंध आणि उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण अडथळे ठरत आहेत.
यासाठी गेल्या दोन दशकापासून नेटवर्क ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही/एड्स NADP+ , अहमदनगर ही समुदाय आधारित सामाजिक संस्था एच.आय.व्ही सह जगणाऱ्या व्यक्तींसाठी संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात २००४ पासून कार्यरत आहे. संस्थेचा उद्देश एच.आय.व्ही सह जगणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे, एच.आय.व्ही संसर्ग रोखणे आणि त्यांच्या आरोग्याचे रक्षण करून समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देणे आहे. सद्यस्थितीत अहमदनगर जिल्ह्यामधे ए.आर.टी.केंद्रात २२९६७ नोंदणी झालेल्या व्यक्तिना तसेच त्यांचे जोडीदार व कुटुंबातील सदस्य अशा ५०,००० हुन जास्त लोकांना या संस्थांमार्फत सेवा पुरविण्यात येत आहेत.
तेव्हा जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधत ‘समुदायाला नेतृत्व करू द्या’ या घोषणेला वास्तविक रूप देत जिल्ह्यातील सद्यस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी नेटवर्क ऑफ अहमदनगर डिस्ट्रिक्ट बाय पीपल लिव्हिंग विथ एचआयव्ही/एड्स NADP+ , अहमदनगर संस्थेचे अध्यक्ष श्री प्रशांत येंडे यांनी लोकप्रतिनिधि खासदार - श्री डॉ सुजय
विखेपाटील साहेब व आमदार नीलेश लंके साहेब , आमदार संग्राम जगताप साहेब , आमदार शंकर राव गडाख साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली . संस्थेच्या कामकाजाविषयी माहिती देताना त्यांनी सांगितले की, “संस्थेतर्फे समुदायासाठी HIV प्रतिबंधात्मक दृष्टिकोनातून मानसिक आणि शारीरिक आरोग्याकरिता समुपदेशनासोबतच सर्व प्रकारच्या संदर्भ सेवा पुरवल्या जातात. परंतु या समुदायाच्या गरजा एचआयव्ही प्रतिबंध आणि संबंधित आरोग्य सेवांच्या पलीकडे आहेत. ज्या आर्थिक सुरक्षेच्या दृष्टीने उपलब्ध सामाजिक सुरक्षा योजनांशी जोडलेल्या असल्या पाहिजेत. याकरिता, त्यासंदर्भातील समावेश वाढविण्यासाठी प्रभावीपणे अंमलबजावणी होणे व त्यातील धोरणात्मक अडथळे दूर करणे आवश्यक आहे. तसेच व्यावसायिक प्रशिक्षण, रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.”
" माझे आरोग्य , माझी जबाबदारी" या अभियानाअंतर्गत सामुदायिक नेतृत्व करताना भविष्यात उद्भवणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संस्था प्रतिबद्ध राहील”, असे म्हणत त्यांनी शासनाकडून वेळोवेळी सहकार्य व पाठिंबा मिळावा अशी विनंती करून निवेदन सादर केले. यावेळी संस्थेतर्फे श्री प्रशांत येंडे (अध्यक्ष NADP +) उपस्थित होते. त्याचबरोबर वैष्णवी सवई (विहान प्रकल्प समन्वयक ) , जयश्री शिंदे , माधवी पुंड , कल्पना कुमठेकर , संगीता दराडे , सुमन गवरी , उषा डाडर , अभिजीत खपके यांनी समुदायाच्या वतीने मुद्दे मांडले.” भारतातून २०३० पर्यंत ‘एड्स’ चे समूळ उच्चाटन करण्याचे राष्ट्रीय तसेच जागतिक उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि शाश्वत बदल घडवण्यासाठी सर्वच क्षेत्रातून समुदायाला सहकार्य व पाठिंबा मिळणे गरजेचे आहे तरच ते साध्य होईल”, असेही यावेळी नमूद करण्यात आले.
या भेटीदरम्यान मान्यवरांनी, “समुदायाला सुदृढ ,सुशिक्षित आणि मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वप्रकारे सहकार्य करू” असे आश्वासन दिले. यावेळी ते बोलताना म्हणाले कि, “हि गाठभेट निश्चितच फलदायी ठरेल. संस्था खूप चांगले कार्य करीत आहे तेव्हा आमचे सहकार्य व पाठिंबा नेहमीच राहील. याअनुषंगाने पुढील नियोजित बैठकीत शासनाला सादर करण्याच्या प्रस्तावावर सविस्तरपणे चर्चा करण्यात येईल.”
टिप्पणी पोस्ट करा