Ajay Devgan : ‘कॉफी विथ करण’मध्ये अजय देवगणला विचारला प्रश्न; सलमान की शाहरुख कोण आहे ....

 

ब्युरो टीम : निर्माता-दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोचा आठवा सिझन सध्या चांगलाच चर्चेत आहे. या शोमध्ये आतापर्यंत आलिया भट्ट, करीना कपूर, आदित्य रॉय कपूर, काजोल, राणी मुखर्जी यांसारख्या सेलिब्रिटींनी हजेरी लावली. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये ‘सिंघम’ अभिनेता अजय देवगण आणि निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी या दोघांनी करणसोबत खूप गप्पा मारल्या. करणने नेहमीच शोमध्ये आलेल्या सेलिब्रिटींनी रंजक आणि तितकेच मसालेदार प्रश्न विचारले. या एपिसोडमध्ये करणने मात्र अजयला असा प्रश्न विचारला, जे ऐकून ‘सिंघम’सुद्धा थोडा संभ्रमात पडला.

करण जोहरच्या या शोमध्ये अजय आणि करणने खूप मजामस्करी केली. रॅपिड फायर राऊंडमध्ये करणने अजयला विचारलं की शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांपैकी कोणावर अधिक विश्वास केला जातो. या प्रश्नाचं उत्तर अजयने अत्यंत चलाखीने दिलं. बँक बॅलेन्सच्या हिशोबाने मला असा वाटतं की शाहरुख खानकडे जास्त आहे, असं तो म्हणतो. अजयचं हे उत्तर ऐकून करणसुद्धा होकार देत म्हणतो, “हो, खासकरून यावर्षी.” 2023 या वर्षभरात आतापर्यंत शाहरुखचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.

जवळपास चार वर्षांच्या ब्रेकनंतर शाहरुखचा ‘पठाण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर ‘जवान’ आणि आता गुरुवारी ‘डंकी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पठाण आणि जवानने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई केली. हे दोन्ही चित्रपट या वर्षातील सर्वाधिक कमाई केलेल्या चित्रपटांपैकी आहेत. तर ‘डंकी’ने पहिल्या दिवशी 30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. डंकीची कमाई ही पठाण आणि जवानच्या तुलनेत कमी आहे. तर दुसरीकडे सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ आणि ‘टायगर 3’ हे दोन चित्रपट प्रदर्शित झाले. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही. मात्र ‘टायगर 3’ने समाधानकारक कमाई केली.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने