ब्युरो टीम : अभिनेता रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना यांचा बहुचर्चित ‘ॲनिमल’ हा चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाच्या ॲडव्हान्स बुकिंगने बरेच विक्रम मोडले होते. त्यामुळे फर्स्ट डे फर्स्ट शोलाही प्रेक्षकांची चांगली गर्दी थिएटरमध्ये जमली. हा चित्रपट पाहणाऱ्यांनी ट्विटरवर त्याविषयी प्रतिक्रिया दिली आहे. रणबीरचा हा ॲक्शन चित्रपट कसा वाटला, याविषयी त्यांनी सांगितलं आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटाला प्रेक्षकांनी ‘ब्लॉकबस्टर’ म्हटलंय. याआधी संदीपने तेलुगूमधील ‘अर्जुन रेड्डी’ आणि हिंदीतील ‘कबीर सिंग’चं दिग्दर्शन केलं होतं.
रणबीरची पत्नी आणि अभिनेत्री आलिया भट्टने सर्वांत आधी ‘ॲनिमल’वर प्रतिक्रिया दिली आहे. प्रीमिअर शो पाहिल्यानंतर तिने सोशल मीडियावर ‘खतरनाक’ असं लिहिलंय. त्यानंतर शुक्रवारी सकाळपासूनच फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. अनेकजण चित्रपटातील रणबीरच्या दमदार अभिनयामुळे प्रभावित झाले आहेत. ‘गँग्स ऑफ वासेपूर’नंतर हा सर्वांत मोठा भारतीय चित्रपट ठरणार, असाही अंदाज काहींनी व्यक्त केला आहे. रणबीरसोबतच अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. ‘पहिली 25 मिनिटं आणि रणबीरच्या अप्रतिम अभिनयाने अंगावर काटाच आला. हा चित्रपट मेगा ब्लॉकबस्टर ठरणार’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलंय. अनेकांनी या चित्रपटाला चार ते पाच स्टार्स दिले आहेत.
‘ॲनिमल’ हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी जगभरात प्रदर्शित झाला आहे. रणबीरने चित्रपटात अर्जुन नावाच्या गँगस्टरची भूमिका साकारली आहे. जो अत्यंत निर्दयी आणि तितकाच महत्त्वाकांक्षी आहे. आपलं ध्येय साध्य करण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. या चित्रपटाच्या कथेत वडील आणि मुलाच्या नात्याला विशेष अधोरेखित केलं आहे. संघटित गुन्हेगारीचं वेगळंच विश्व या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. विश्वासघात आणि सत्तासंघर्ष हे या गुन्हेगारी विश्वात सतत पहायला मिळतं. अर्जुन हा याच अंडरवर्ल्डमधील एक उगवता तारा आहे. त्याला स्वत:चं अस्तित्व प्रस्थापित करायचं आहे. यावेळी तो आणि बॉबी देओल एकमेकांसमोर येतात. रणबीरसोबतच बॉबी देओलच्याही अभिनयाचं विशेष कौतुक होत आहे. याशिवाय चित्रपटात अनिल कपूर, रश्मिका मंदाना यांच्याही भूमिका आहेत.
टिप्पणी पोस्ट करा