ब्युरो टीम : भाजपमध्ये तिकिटांचा निर्णय केंद्रीय समिती करते त्यामुळे कोणाला तिकीट द्यायचे हा निर्णय त्यांचा असतो . मी 15 वर्षे आमदार , ऊर्जामंत्री म्हणून चांगले काम करूनही पक्षाने मला लढू नका म्हणून सांगितले होते. त्यामुळे भाजपमध्ये केव्हाही कोणाला तिकीट देऊ शकतो आणि कोणालाही थांबवू शकतो असे सांगितले. माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी गेल्या 40 वर्षात झाली नाहीत एवढी कामे केली आहेत. ते देशातील टॉप 10 खासदाराच्या आहेत त्यामुळे त्यांच्या कामाचे मी फक्त कौतुक केल्याचा खुलासा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला .
माढा लोकसभा मतदारसंघासाठी निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्याने कालपासून बावनकुळे मध्यस्थीच्या प्रयत्नात होते . काल अडीच तास मोहिते पाटील आणि निंबाळकर माझ्यासोबत होते. दोघात मतभेद आहेत पण मनभेद नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला. काही झाले तरी माढा लोकसभेची जागा मोठ्या मताधिक्याने भाजप जिंकेल असेही त्यांनी सांगितले
राम मंदिर निमंत्रणावरून सुरु असलेल्या टीकेला उत्तर देताना बावनकुळे यांनी संजय राऊत आणि काँग्रेस नेत्यांचे नाव न घेता सडकून टीका केली . देशातील 140 कोटी जनतेला माहित आहे राममंदिर कोणामुळे झाले. गेली 527 वर्षे रामलल्ला तंबूत होते ते आता 22 जानेवारी रोजी जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात जात आहेत. हे घडण्यासाठी मोदी यांना पंतप्रधान बनावे लागले आणि नंतर हा योग्य त्यांनी घडवून आणला असे सांगितले. राममंदिर उभारल्याने अनेकांच्या पोटात दुखत असून 65 वर्षे राज्य करणाऱ्यांनी त्यांच्या काळात का हे केले नाही असा सवाल केला .
बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
निमंत्रणावरून उठलेल्या वादावर बोलताना तुम्ही एक दिवस कारसेवा केली पण हे मंदिर उभारावे यासाठी देशभरातील लाखो लोकांनी आपली हयात घालवली. अशा लोकांना 22 तारखेला निमंत्रण मिळाले असेल. कोणाला बोलावयाचे हा त्या न्यासाच्या अधिकार आहे असे सांगताना मलाही अजून निमंत्रण मिळालेले नाही असे सांगत दर्शन घ्यायला निमंत्रण आणि 22 तारीखच कशाला पाहिजे असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला . आक्रोश मोर्चावर सडकून टीका करताना आता त्यांना आक्रोश केल्याशिवाय पर्याय नाही असे सांगत आपल्या अडीच वर्षाच्या काळात काय काम केले हेही या मोर्चात सांगा असा टोला लगावला
विरोधकांचे मोर्चे काढणे हे कामाचं असून यांच्या पाठीशी ना कष्टकरी आहेत ना शेतकरी असा टोला लगावला. यावेळीही सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर स्वामी अनुपस्थित असल्याचे निदर्शनास आणून देत ते कधी येताच नसल्याचे सांगितल्यावर पक्ष सगळ्यांच्या कामाचे प्रगतीपुस्तक बघतो असे सांगितले. पंढरपूर शहरातील अवैध वाळू उपसा , बेकायदेशीर व्यवसाय यावर छेडले असता आज तातडीने गृहमंत्र्यांशी बोलून त्यांचे कंबरडे मोडणार अशी घोषणा बावनकुळे यांनी केली . यावेळी आमदार समाधान अवताडे , माजी आमदार प्रशांत परिचारक , माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांचेसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा