ब्युरो टीम : “मी एक कारसेवक म्हणून, माझ्याकरता हा अतिशय आनंदाचा क्षण आहे. मी सगळ्या कारसेवांमध्ये होतो. मी 21 व्या वर्षी बदायूच्या जेलमध्ये होतो. सगळ्या प्रकारच्या आंदोलनात होतो, जिथे गोळीबार झाला तिथे मी होतो, ज्यावेळेस ढाचा तुटला तिथेही मी होतो”, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्यांनी अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर आनंद व्यक्त केला. “एक कारसेवक म्हणून मला मनापासून आनंद आहे की, जो संघर्ष 500 वर्ष चालला. अनेक लढाई चालल्या, या सर्व लढायांना एकप्रकारे मंजिल मिळालं आहे. कारसेवक म्हणून मी मनापासून आनंदी आहे”, असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
“आम्ही नेहमीच सांगितलं आहे की, मंदिर हा राजकारणाचा, निवडणुकीचा विषय नाही. शेवटी बाबराचा सेनापती मिरबाकी याने जेव्हा राम मंदिर तोडलं, त्यावेळी त्याला माहिती होतं की, भारताचं मानक म्हणजे प्रभू राम मंदिर, ते आराध्य दैवत आहेत. त्यांना हे दाखवायचं होतं की, तुमच्या देवालाही आम्ही शिल्लक ठेवत नाहीत तर तुम्ही कोण आहात? याकरता गुलामीचं प्रतिक म्हणून मंदिर तोडून तिथे बाबरी ढाचा तयार केला होता. हे केवळ मंदिर नाही तर भारताच्या अस्मितेचं एक द्योतक आहे. गुलामीचं प्रतिक हटवून भारताने पुन्हा आपलं जे संस्कृतीत प्रतिक आहे, ते स्थापन केलं आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘निमंत्रण येवो किंवा न येवो…’
“या देशातील जनतेच्या मनातून तुम्ही राम हा शब्द काढूच शकत नाही. प्रभू श्रीराम हे आमच्या मनात, रक्तात, सगळ्याच्या डोक्यात आहेत. कितीही प्रयत्न केला तरी राम नाम आमच्या मनातून निघू शकत नाही. रामउत्सव हा आयोजित करावा लागत नाही. लोक उत्सफुर्तपणे उत्सव करतात”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. “राम मंदिराच्या उद्घाटनाचं कुणाला निमंत्रण आहे किंवा नाही ते मला माहिती नाही. निमंत्रण येवो किंवा न येवो, राम मंदिराचं उद्घाटन होतंय. जो जो हिंदू त्याच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे”, असंदेखील देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘त्यांच्या वजनाने तो ढाचा पडला असेल तर…’, उद्धव ठाकरेंचा टोला
उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर प्रतिक्रिया दिली. “अयोध्येत मी कधीही जाईन, कधीही रामलल्लाचं दर्शन घेईन. तूर्त मला एवढंच वाटतं की, याची एक पॉलिटिकल इव्हेंट होऊ नये हीच माझी अपेक्षा आहे. बाकी आम्हाला सगळ्यांना आनंद झालाच आहे, तो प्रत्येक हिंदूंना आणि रामप्रेमींना होणं स्वाभाविक आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंना देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ठिक आहे, ते बाबरी मिशिदीवर चढले असतील आणि त्यांच्या वजनाने तो ढाचा पडला असेल तर मला माहिती नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा