ब्युरो टीम : युवा विकेटकिपर फलंदाज ईशान किशन याने दक्षिण आफ्रिकेविरोधोतील कसोटी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला. बीसीसीआयकडून 17 डिसेंबर रोजी याबाबतची माहिती दिली होती. ईशान किशन याने वैयक्तिक कारणामुळे कसोटी मालिकेतून ब्रेक घेतल्याचे बीसीसीआयने ट्वीट करत सांगितले होते. पण मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईशान किशनच्या या निर्णयामागील मोठं कारण समोर आलेय.
इंडियन एक्स्प्रेसने एका सूत्राच्या हवाल्याने ईशान किशनबाबतचं वृत्त प्रसारित केलेय. त्यामध्ये असे म्हटलेय की, ईशान किशनने मानसिक थकवटीमुळे कसोटी मालिकेतून माघार घेतली. ईशान किशन याने टीम इंडियाच्या व्यवस्थापनाला याबाबत सांगितले होते. मानसिकदृष्ट्या थकलेलो आहे, पुढील काही दिवस क्रिकेटपासून ब्रेक घ्यायचा असल्याचे ईशान किशन याने सांगितले होते. ईशानच्या विनंतीला संघ व्यवस्थापनाने सहमती दर्शवली.
मानसिक थकवा येण्याचे कारण काय ?
ईशान किशन मागील वर्षभरापासून टीम इंडियाच्या प्रत्येक स्क्वाडचा सदस्य राहिलाय. भारतात आणि विदेशातही त्याने टीम इंडियासोबत प्रवास केलाय. सराव सत्र असो सामना असो तो प्रत्येकवेळा टीम इंडियासोबत राहिलाय. पण या काळात एक-दोन खेळाडू काही कारणास्तव संघाबाहेर राहिले तेव्हाच त्याला संधी मिळाली. अशा परिस्थितीत प्रत्येक वेळी सामन्याची तयारी करणे आणि नंतर बेंचवर बसणे हे देखील मानसिक थकावटीचे कारण असू शकतं.
आफ्रिकाविरोधातही प्लेईंग 11 मध्ये संधी मिळण्याची शक्यता कमीच होती. अशा स्थितीत यावेळीही तो सरावात सहभागी झाला असता पण बेंचवरच बसावे लागले असते. कदाचित त्यामुळेच ईशानने बीसीसीआयला या कसोटी मालिकेतून विश्रांती देण्याची विनंती केली असेल.
विराट कोहली मायदेशी परतला -
किंग कोहली कसोटीमधून माघार घेत तातडीने मायदेशी परतला आहे. कौटुंबिक कारणामुळे कोहली माघारी परतला आहे. दुसरीकडे, ऋतुराज गायकवाड कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. गायकवाड दुखापतीशी झुंजत असून तो अद्याप तंदुरुस्त झालेला नाही. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियनमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला तगडा झटका बसला आहे. दरम्यान, किंग कोहली कसोटी संघात पुन्हा वेळेत परतणार असल्याची चर्चा आहे.
टिप्पणी पोस्ट करा