Maratha Arkashan : मनोज जरांगे पाटलांची बाजू आणखी बळकट होणार; मराठा आरक्षणाला आता देशातील 'या' राज्यातून पाठींबा जाहीर

 

ब्युरो टीम : मराठा आरक्षणाच्या विषयाची चर्चा राज्यभरात सुरु आहे. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केल्यापासून देशभरात त्याची दखल घेतली गेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत आपणास मनोज जरांगे पाटील कोण आहेत? असा प्रश्न विचारला होता, असे म्हटले होते. आता मनोज जरांगे पाटील २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण करणार आहे. बीड येथील झालेल्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी ही घोषणा केली होती. यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची देशपातळीवर चर्चा सुरु झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला देशातून पाठिंबा मिळू लागला आहे. हरियाणामधील मनोज जरांगे यांना समर्थन मिळाले आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर हे आंदोलन देशपातळीवर उभारण्याचा इशारा दिला आहे.

रोड मराठा समाजाचा इशारा

हरियाणा मधील पानिपतच्या रोड मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे. सरकार मराठा समाजाला आरक्षण देईल, अशी आम्हाला आशा आहे. मात्र सरकारने महाराष्ट्रातील मराठा समाजाला आरक्षण दिले नाही, तर आम्ही जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाला देशव्यापी आंदोलन बनवू, असा इशारा हरियाणातील रोड मराठा समाजाने दिला आहे.

आता प्रत्येक राज्यातील मराठा एकत्र

मराठा समाज देशातील प्रत्येक राज्यात आहे. मराठा समाजाला आरक्षण दिले नाही तर आम्ही राज्यस्तरीय असलेले मराठा आंदोलन देशव्यापी आंदोलन करु. आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका रोड मराठा समाजाने स्पष्ट केली आहे. पुण्यातील मराठा समाज आणि शिवप्रेमींना 14 जानेवारीला हरियाणातील पानिपत येथे होणाऱ्या पानिपत शौर्य दिनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी आले असताना, त्यांनी ही भूमिका मांडली. यामुळे २० जानेवारीपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा ठोस निर्णय झाला नाही तर देशपातळीवर विविध ठिकाणी आंदोलन सुरु होण्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने