ब्युरो टीम : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चांगली मैत्री आहे. त्या दोघांच्या भेटीच्या बातम्या अनेकदा येत असतात. नाना अनेकदा खुमासदार शैलीत अजित पवारांना चिमटेही काढतात. काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी बंडखोरी करत काही आमदारांना सोबत घेत शिंदे व फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आणि ते मुख्यमंत्री झाले. त्यांनी शरद पवारांची साथ सोडली, याबाबत विचारल्यावर नाना पाटेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘झी २४ तास’ ला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांनी एकेकाळी शरद पवार त्यांचे हिरो होते, असा खुलासा केला. अजित पवारांना खूप जवळून पाहत होतात, त्यांनी शरद पवारांची साथ सोडली, त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न नाना यांना या मुलाखतीत विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले, “मला कळतच नाहीये. मला राजकारणातील कोणत्याच गोष्टीबद्दल आता भाकित करताच येत नाहीये, बोलताच येत नाहीये.”
नाना पाटेकर पुढे म्हणाले, “मी एकेकाळी म्हणायचो शरद पवार माझे हिरो होते. आमच्या वयात १० वर्षांचं अंतर आहे. हा माणूस महाराष्ट्रासाठी काहीतरी ग्रेट करेल असं वाटायचं. तुम्हाला जेव्हा तुमच्या कळत्या, न कळत्या वयात काही गोष्टी वाटत असतात आणि त्यावेळी तो माणूस सातत्याने काहीतरी करतोय तेव्हा तुम्हाला अजून आनंद होतो.”
पुढे ते म्हणाले, “नंतर नंतर तुमचा थोडासा भ्रमनिरास व्हायला लागतो. कारण तुमचीही राजकारणाबाबत काही ठाम मतं होऊ लागतात. ती बरोबर, चूक हा भाग अलाहिदा. कालांतराने तुमचे हिरो बदलत राहतात. पण खेळातले वगैरे हिरो बदलले तर काही वाटत नाही. पण इथे (राजकारणात) तुमचे कयास नसतात तर तुमच्या इच्छा असतात. इथे तुम्ही भावनिकरित्या खूप गुंतलेले असता. त्यामुळे इथे हिरो बदलले की वाईट वाटतं. एखाद्याच्या बोलण्यात सातत्य नसेल तर मी कसा विश्वास ठेवायचा?” असा प्रश्न नाना पाटेकरांनी उपस्थित केला.
टिप्पणी पोस्ट करा