Narendra Modi : संसदेच्या सुरक्षेतील ही गंभीर त्रुटी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील मंत्र्यांना सूचना

 

ब्युरो टीम : संसदेच्या सुरक्षेत झालेल्या मोठ्या चुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पंतरप्रधान मोदी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेण्याचे आणि त्यावर राजकारण करू नये असे निर्देश दिले आहे. आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे असं ही ते म्हणाले आहेत.

विरोधी पक्षाने आज यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून उत्तर मागितले होते. दोन्ही सभागृहांमध्ये यावरुन गदारोळ झाला. त्यानंतर  14 खासदाराचे सभागृहात अवमान आणि अनादर केल्याबद्दल निलंबन करण्यात आले. टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे.

सरकारने काय म्हटले?

संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, “कालची घटना दुर्दैवी होती. लोकसभा सदस्यांच्या सुरक्षेतील ही गंभीर त्रुटी होती. हे आपण सर्व मान्य करतो. लोकसभा अध्यक्षांच्या सूचनेवरून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे.

विरोधकांचा हल्लाबोल

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी राज्यसभेत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. सुरक्षेत चूक ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं त्यांनी म्हटले होते. अमित शहा यांनी सभागृहात उत्तर द्यावे. असे त्यांनी म्हटले होते. केंद्रीय मंत्री पियुष गोयल म्हणाले होते की, काँग्रेससह इतर पक्ष राजकारण करत आहेत. राजकारण करण्यापेक्षा देशाला एकात्मतेचा संदेश द्यायला हवा. यानंतर विरोधी आघाडी ‘इंडिया’ने सभागृहातून वॉकआउट केला.

लोकसभेच्या कामकाजादरम्यान दोन जणांनी बुधवारी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. यादरम्यान दोघांनी डब्यातून पिवळा धूर पसरवला. काही खासदारांनी त्यांना धरलं. दुसरीकडे अमोल शिंदे आणि नीलम देवी यांनी संसद परिसराबाहेर कॅनमधून रंगीत धूर सोडला आणि ‘हुकूमशाही चालणार नाही’ अशा घोषणा दिल्या.

पोलीस काय म्हणाले?

सागर, मनोरंजन, अमोल, नीलम आणि विकी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांचा दुसरा साथीदार ललित याचा शोध सुरू आहे. पोलिसांनी सांगितले की, सहाही जण एकमेकांना आधीच ओळखत होते आणि त्यांनी काही दिवसांपूर्वी कट रचला होता.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने