ब्युरो टीम : ‘मै हूं डॉन गाण्यावर’, दाऊदचा राईट हँड सलीम कुत्तासोबत ठाकरे गटाचे नेते, सुधाकर बडगुजरांचा डान्सचा हा व्हिडीओ 6 वर्षांआधीचा आहे. पण त्यावरुन भाजपचे आमदार नितेश राणेंनी नाशिकचे ठाकरे गटाचे नेते, सुधाकर बडगुजर यांच्या अटकेची मागणी केलीय. मुंबईच्या 1993च्या बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा भोगत असलेला सलीम कुत्ता पॅरोलवर 6 वर्षांआधी बाहेर आला होता. त्यावेळी कुत्तासोबत बडगुजरांनी पार्टी केल्याचा आरोप राणेंनी केलाय. आपला सलीम कुत्ताशी संबंध नाही. भेट झाली असेल किंवा मॉर्फिंग केलं असेल असं सुधाकर बडगुजर म्हणतायत. मात्र नितेश राणेंनंतर शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री दादा भूसे विधानसभेत आक्रमक झाले.
सलीम कुत्ता कोण आहे?
सलीम कुत्ता याचं खरं नाव मोहम्मद सलीम मीर शेख असं आहे. मोहम्मद शेख उर्फ सलीम कुत्ता 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी आहे. कोर्टाने सलीम कुत्ताला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर सुप्रीम कोर्टाने 2013 साली ही शिक्षा वैध ठरवली. सलीम कुत्तावर स्फोटात वापरलेले साहित्य पुरवल्याचा आरोप आहे. बॉम्बस्फोटातील महत्त्वाचा आरोपी मोहम्मद डोसा याची मोहम्मद शेथ उर्फ सलीम कुत्ताशी जवळीक आहे.
मोहम्मद डोसा याच्याशी संपर्क ठेवून शस्त्रसाठा पुरवल्याचा आरोप सलीम कुत्तावर आहे. गुजरातमधून हा शस्त्रसाठा जमा करुन तो महाराष्ट्रात आणण्यात आला होता. हाच साठा स्फोटांसाठी वापरला गेला होता. सलीम कुत्तावर रायगडच्या शेखाडी किनाऱ्यावर उतरवलेले RDX पुरवल्याचाबी आरोप आहे. बॉम्बस्फोटासाठी गुजरातमधून शस्त्रसाठा आणण्यात सलीम कुत्ताची भूमिका होती. अंडरवर्ल्ड डॉन टायगर मेमनसाठी सलीम कुत्ता काम करत होता. टायगर मेमन आणि जावेद चिकनानंच 1993च्या बॉम्बस्फोटाचा कट रचला होता.
राजकारणात तुफान घडामोडी
ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्तासोबत डान्स समोर आल्यानंतर, गृहमंत्री फडणवीसांनीही SITद्वारे चौकशीची घोषणा केली. नितेश राणेंनी, सलीम कुत्तासोबत बडगुजरांचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सुषमा अंधारेंनीही या व्हिडीओची कहानीच सांगितली. सलीम कुत्ता आणि बडगुजरांचा व्हिडीओ, दाऊदच्या नातेवाईकाच्या मुलाच्या लग्नातला आहे आणि त्याच लग्नात मंत्री गिरीश महाजन आणि तत्कालीन भाजपचे आमदार बाळासाहेब सानप उपस्थित होते. तो फोटो अंधारेंनी समोर आणलाय. याच फोटोत व्यावसायिक विक्रांत चांदवडकरही होते. त्या लग्नात ठाकरे गटाचे त्यावेळी नाशकातले बरेच नेते उपस्थित होते असं चांदवडकर म्हणालेत. ज्या बडगुजरांवर आरोप झालेत…ते बडगुजरांचाही परिचय जाणून घेवूयात…
सुधाकर बडगुजर कोण आहेत?
सुधाकर बडगुजर शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख आहेत. त्यांनी 2014साली विधानसभा निवडणूक अपक्ष लढली, मात्र निवडणुकीत पराभव झाला. त्यांनी नाशिक महानगरपालिकेत ठाकरे गटाकडून सभागृह नेता, विरोधी पक्षनेता पदांवर काम केलंय. ते 2017 साली शिवसेनेकडून महापौर पदाचे उमेदवार होते. सुधाकर बडगुजर नाशिक महापालिकेत म्युनिसिपल कामगार सेनेचे अध्यक्ष आहेत. सुधाकर बडगुजर आणि त्यांच्या पत्नी हर्षाताई बडगुजर दोघांनीही नगरसेवक म्हणून काम पाहिलंय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राणेंनी केलेल्या मारहाणीच्या वक्तव्यावरुन याच, बडगुजरांनी नारायण राणेंविरोधात पहिला गुन्हा दाखल केला होता. आता नितेश राणेंनी व्हिडीओ बाहेर काढलाय.
ज्या व्हिडीओवरुन, भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी विधानसभेत SITची मागणी केली. त्याच लग्न सोहळ्यात त्यावेळी भाजपचेही मंत्री आणि आमदार सहभागी होते. असे फोटो अंधारेंनी समोर आणलेत. आता SIT चौकशी सुरु होईल. त्याआधी नाशिक पोलिसांनीही बडगुजरांना चौकशीसाठी बोलावलंय.
टिप्पणी पोस्ट करा