ब्युरो टीम : ब्राह्मणांना कोणतंही आरक्षण नाही, हे परमेश्वराचे खूप मोठे उपकार आहेत. त्यामुळे आता ब्राह्मण समाजातील लोक व्यवसाय करतात. वडापावचं दुकान टाकत आहेत. सलून टाकत आहेत. पुण्यातील प्रत्येक घरातील मुलगा अमेरिकेत गेला आहे, असं केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. तुमची इच्छाशक्ती असेल तर कामे होतात. अडचणी असतातच. पण त्यातूनही मार्ग काढला पाहिजे, असा सल्लाही गडकरी यांनी दिला.
केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी हे पार्ल्याच्या लोकमान्य सेवा संघाच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर मते मांडली. मला सात डॉक्टरेट मिळाल्या. पण मी नावापुढे डॉक्टर नाही लावत. मी दहावीला होतो. तेव्हा एमर्जन्सी लागली. त्या आंदोलनात मी होतो. त्यात वर्ष गेलं. मला दहावीत 52 टक्के मार्क मिळाले. सायन्समध्ये 49 टक्के मिळाले. माझ्या बहिणीचे मिस्टर सायंटिस्ट होते. आमच्या घरीही शिकलेली मंडळी होते. त्यावेळी माझी लाईन ठिक नाही असं घरच्यांना वाटायचं. तेव्हा, मी नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा होईल, असं सांगायचो. तेव्हा घरचे हसायचे. आपल्याकडे बँकेत किंवा शिक्षकाची नोकरी करतात. परमेश्वराने ब्राह्मणांवर खूप मोठे उपकार केले. त्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण नाही. त्यामुळे ते वडापावचं दुकान टाकत आहेत. सलून टाकत आहे. पुण्यातील प्रत्येक घरातील मुलगा अमेरिकेत गेलाय, असं नितीन गडकरी म्हणाले.
विचार शून्यता हीच समस्या
यावेळी त्यांनी आयाराम गयाराम संस्कृतीवरही टीका केली. राजकीय पक्ष आणि विचाराचा काय संबंध आहे? राजकीय पक्षाचा संबंध निवडणूक जिंकण्याशी असतो. त्यादृष्टीने ते विचार करातात. देशात विचार भिन्नतेपेक्षा विचार शून्यता ही सर्वच क्षेत्रातील समस्या आहे. आज नायदर रायटिस्ट नॉर लेफ्टिस्ट, यू आर नोन अपॉर्च्युनिस्ट हे राजकारणातील सूत्र आहे. कोण कोणत्या पार्टीत केव्हा येतात, केव्हा घुसतात आणि कुठे जातात हे कोणीच सांगू शकत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
तुमची इच्छाशक्ती हवी
समस्या आहेत. प्रॉब्लेम आहेत. काही समस्या शासकीय आहेत, काही आर्थिक आणि काही नैसर्गिक असतात. पण तुमची इच्छाशक्ती प्रामाणिक हवी. काही समस्या आपल्या रिचमध्ये आहे. काही रिचच्या बाहेर असतात. त्यामुळे आपण चालत राहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.
टिप्पणी पोस्ट करा