Parliment ; संसदेतील घटनेचे विधानसभेत पडसाद; विधानसभा अध्यक्षांनी घेतला मोठा निर्णय ; आता आमदारांना...

 

ब्युरो टीम : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा (१३ डिसेंबर) १० वा दिवस आहे. आज लोकसभेचं कामकाज सुरू असताना मोठा गोंधळ पाहायला मिळाला. दोन अज्ञात व्यक्तींनी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारल्या. खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत हे दोघेजण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. दरम्यान, अनेक खासदारांनी या दोन इसमांना घेरलं. त्याचवेळी या दोघांनी त्यांच्या बूटातून स्मोक कॅन बाहेर काढले आणि सभागृहात धूर केला. सुरक्षा व्यवस्था भेदून हे दोघे सभागृहापर्यंत पोहोचल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे.

दरम्यान, संसदेत घडलेल्या या घटनेचे महाराष्ट्राच्या विधानसभेतही पडसाद उमटले. नागपूर येथे महाराष्ट्र विधीमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनादरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी संसदेतल्या सुरक्षा व्यवस्थेचा मुद्दा मांडला. तसेच आपणही काळजी घ्यायला हवी असं म्हणाले. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मीसुद्धा वारंवार सर्व सदस्यांना विनंती केली आहे की आवश्यक असतील तेवढेच व्हिजीटर्स पास काढून घ्या. कोणीही अधिक पासेसची मागणी करू नका.


विधानसभा अध्यक्षांच्या प्रतिक्रियेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील हाच मुद्दा मांडला. तसेच पवार म्हणाले, “माझी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींना विनंती आहे की, आपण विधीमंडळाचे पासेस कमी करायला हवेत.” अजित पवार यांच्या मागणीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले, मी जाहीर करत आहे की आजपासून प्रत्येक आमदाराला जास्तीत जास्त दोन पासेस दिले जातील. त्याव्यतिरिक्त तिसरा पास दिला जाणार नाही.

संसदेत काय घडलं?

लोकसभेचं कामकाज सुरू असताना अचानक दोन जण प्रेक्षक गॅलरीतून खाली सभागृहात आले. दोघांनी लागोपाठ उड्या मारल्या. मग दोघेही खासदारांच्या बाकांवरून उड्या मारत लोकसक्षा अध्यक्षांच्या खुर्चीच्या दिशेने धावत होते. परंतु, इतर खासदारांनी या दोघांना घेरलं. त्यानंतर या दोघांनी बूटातून काहीतरी (स्मोक कॅन) काढलं, त्यातून सभागृहात धूर पसरू लागला. त्याचवेळी खासदारांनी या दोघांना पकडून चोप दिला. त्यापैकी एकाचं नाव सागर असं सांगितलं जात आहे. कर्नाटकमधल्या म्हैसूरचे खासदार प्रताप सिंह यांच्या मदतीने या दोघांनी प्रेक्षक सभागृहाचा पास (परवाना) बनवून घेतला होता. दरम्यान, सभागृहात हा प्रकार सुरू असताना संसदेच्या बाहेर एक महिला घोषणा देत होती. या महिलेलालाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने