ब्युरो टीम : पुण्यात विकास कामांसाठी कात्रज कोंढवा रस्त्यावर अनोखं आंदोलन करण्यात आलं आहे. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनाचे बॅनर लावत कात्रज कोंढवा रस्त्यावर स्थानिकांनी हे आंदोलन केलेय. आमदार आणि खासदारांनी भाषणात केलेल्या आश्वासनांचा पाढा वाचत परिसरात रस्त्यावर ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आलेत.
खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे पाटील, आमदार भीमराव तापकीर यांचे फोटो पोस्टर्सवर छापून हे आंदोलन केले जात आहे. सर्व लोकप्रतिनिधींच्या विधानावर टिप्पणी करत विकास कामांसाठी कात्रज कोंढवा भागातील स्थानिक नागरिक आता रस्त्यावर उतरलेत.
पदयात्रा काढत प्रशासन आणि सरकारचा नागरिकांकडून जाहीर निषेध
आमदार आणि खासदा
रांनी विकास कामांची आश्वासने पूर्ण न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. तुम्ही सगळेच म्हणाला होतात कात्रज कोंडवाचा विकास करणार. कुठे आहे आमचा विकास?, असा प्रश्न या बॅनरवर लिहिती संतप्त स्थानिकांनी लोकप्रतिनिधींना सवाल विचारला आहे.
यासह सुप्रिया सुळे अमोल कोल्हे, भीमराव तापकीर यांनी आपल्या भाषणांमध्ये विकासकामांबाबत जी वक्तव्ये केली होती ती वक्तव्ये देखील यावर लिहिण्यात आलीत. कात्रजमधील स्थानिक आणि इतर संघटनांनी एकत्र येथे रस्त्यावर उतरून पदयात्रा काढली. यावेळी स्थानिक नेते नमेश बाबर यांच्या नेतृत्वात पदयात्रेला सुरूवात झाली. आमदार आणि खासदारांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलीच पाहिजेत अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
संतप्त नागरिकांचा रोष पाहून आमदार आणि खासदारांकडून आपली आश्वासने पूर्ण केली जाणार का? की पदयात्रेतील स्थानिक नागरिकांना आपल्या मागण्यांसाठी खरोखर आमरण उपोषण करावे लागणार याकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
टिप्पणी पोस्ट करा