ब्युरो टीम : द्विपक्षीय मालिकांमध्ये बेस्ट पण आयसीसी स्पर्धांमध्ये फेल अशी स्थिती टीम इंडियाची आहे. आयसीसी स्पर्धेत गेल्या दहा वर्षात टीम इंडिया सातत्याने अपयशी ठरली आहे.महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात 2013 मध्ये आयसीसी चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. त्यानंतर आतापर्यंत एकही आयसीसी चषक जिंकता आलेला नाही. कधी साखळी फेरीतून, कधी उपांत्य फेरीतून, तर अंतिम फेरीत पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यात विराट कोहलीनंतर रोहित शर्माकडे नेतृत्व सोपण्यात आलं. मात्र त्यालाही तिन्ही फॉर्मेटमध्ये अपयशाचं तोंड पाहावं लागलं. टी20 वर्ल्डकप 2022, टेस्ट चॅम्पियनशिप 2023 आणि वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत पदरी अपयश पडलं. त्यामुळे आता टीम इंडियाचा आयसीसी चषकांचा दुष्काळ कोण संपवणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेसाठी आतापासून खलबतं सुरु आहेत. दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 च्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरू आहे. वरिष्ठ खेळाडूंनी कसोटी क्रिकेटला प्राधान्य दिलं असलं तरी रोहित शर्माची क्रिकेट कारकिर्द दोन वर्षांपेक्षा जास्त नाही. त्यामुळे रोहित शर्मानंतर टीम इंडियाचं नेतृत्व कोण करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर आकाश चोप्राने दोन नावं सुचवली आहेत.
“मी गेल्या अनेक दिवसांपासून याबाबत चर्चा करत आहे. तो शुबमन गिल होऊ शकतो. पण मी आताची गोष्ट करत नाही मी भविष्याची चर्चा करत आहे. हो यासाठी ऋषभ पंत चांगला पर्याय ठरू शकतो. कसोटी क्रिकेटमध्ये ऋषभ पंत 24 कॅरेट सोनं ठरू शकतो. तो एक चांगला पर्याय आहे. तो गेम चेंजर आहे. जेव्हा रोहित शर्मा सांगेल की कसोटी क्रिकेट संपलं. तेव्हा तुम्ही कर्णधार म्हणून कोणाची नियुक्ती कराल. तर मी नक्कीच या नावाचा विचार करेल.”, असं आकाश चोप्राने यूट्यूब चॅनेलवर सांगितलं.
ऋषभ पंतचा अपघात झाल्यानंतर गेल्या वर्षभरापासून क्रिकेटपासून दूर आहे. आता रिकव्हर होत असून सराव देखील सुरु आहे. पण पूर्णपणे फीट नसल्याचं दिसून आलं आहे. दक्षिण अफ्रिका दौऱ्यातून ऋषभ पंत कमबॅक करेल अशी शक्यता होती. पण 16 सदस्यीय संघात त्याचं नाव नाही. रोहित शर्मा कसोटी संघाचं नेतृत्व करणार आहे. कसोटीत ऋषभ पंतने जबरदस्त कामगिरी केली आहे. आयसीसी पुरुष टेस्ट टीम ऑफ द ईयर 2022 मध्ये निवडला गेलेला एकमेव भारतीय होता.
2022 मध्ये ऋषभ पंतने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने 12 डावात 61.81 च्या सरासरीने आमि 90.90 च्या स्ट्राईक रेटने 680 धावा केल्या होत्या. यात त्याने दोन शतकं आणि चार अर्धशतकं झळकावली होती. त्याने 21 षटकार ठोकले होते. तर विकेटमाघे त्याने सहा स्टपिंग आणि 23 झेल घेतले होते.
टिप्पणी पोस्ट करा