ब्युरो टीम : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार महाविकास आघाडीचे प्रणते म्हटले जातात. परंतु अनेक मुद्यांवर महाविकास आघाडीत बिघाडी आहे. राहुल गांधी आणि काँग्रेस उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर सातत्याने कठोर टीका करत असतात. शिवसेना उबाठा पक्षाकडून गौतम अदानी यांना लक्ष केले जाते. नुकताच उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली धारवीकरांसाठी अदानी यांच्याविरोधात मोर्चा काढण्यात आला होता. महाविकास आघाडीचे दोन पक्ष गौतम अदानी यांच्याविरोधात सातत्याने भूमिका घेत आहे. मात्र शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस गौतम अदानी यांच्यासोबत आहे. यापूर्वी अनेक वेळा हे दिसून आले आहे. आता शनिवारी बारामतीत शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतूक केले. यापूर्वी सप्टेंबर महिन्यात गौतम अदानी आणि शरद पवार यांची बैठक झाली होती. अहमदाबादमधील अदानी यांच्या घरी ही बैठक झाली होती. त्यापूर्वी एप्रिल महिन्यात अदानी यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओकवर भेट घेतली होती
काय म्हणाले शरद पवार
बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानच्या इंजिनिनिअरींग कॉलेजच्या रोबोटीक लॅबचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना शरद पवार यांनी गौतम अदानी यांचे कौतूक केले. त्यांनी गौतम अदानी यांना धन्यवाद दिले. या कार्यक्रमात फिनोलेक्स पॉवर सिस्टीम लिमिटेडचे चेअरमन दीपक छाबरिया उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, तंत्रज्ञानामुळे इंजिनिअरींग क्षेत्र वेगाने बदलत आहे. यामुळे युवकांनी हा बदल स्वीकारला पाहिजे. देशातील पहिले आर्टिफिशियल इंटेलिजेंस सेंटर आम्ही बारामतीत बनवत आहोत. या योजनेसाठी २५ कोटींचा निधी लागणार आहे. त्यासाठी निधीची व्यवस्था झाली आहे. यावेळी गौतम अदानी यांचे नाव घ्यावे लागणार आहे. त्यांनी या प्रकल्पासाठी २५ कोटींचा धनादेश पाठवला आहे. फर्स्ट सिफोटेकने दहा कोटी रुपये दिले आहे. या दोघांच्या मदतीमुळे आम्ही हा प्रकल्प साकारु शकत आहोत.
बारामतीत पहिल्या स्मार्ट कारखान्याचा निर्णय
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, बाजारपेठेत मशीन्स, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरची माहिती असणाऱ्या मनुष्यबळाची गरज आहे. ही वाढती मागणी पूर्ण कराण्यासाठी देशात नवीन तंत्रज्ञान असलेल्या कुशल अभियंत्यांची गरज आहे. यामुळेच विद्या प्रतिष्ठानने बारामतीसारख्या ग्रामीण भागात सुमारे चार हजार चौरस फुटांमध्ये पहिला स्मार्ट कारखाना उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
टिप्पणी पोस्ट करा