ब्युरो टीम : बीड जिल्ह्यास लागूनच असलेल्या शेवगाव-पाथर्डी सारख्या दुष्काळग्रस्त भागातील ऊसतोडणी कामगार म्हणून होणारे स्थलांतर आणि त्यातून होणारी शैक्षणिक परवड ओळखून उचल फाउंडेशनद्वारे सुरू असलेले मुलींसाठीचे शैक्षणिक पुनर्वसनाचे कार्य कौतुकास्पद आहे. अश्या कार्याने भविष्यातील कर्तुत्वान महिला नक्कीच घडतील. पण त्यासाठी आई-वडिलांनी आपल्या मुलींना आपल्या बरोबर ऊसतोडणी व तत्सम कामास न नेता शिक्षणाच्या प्रवाहात ठेवायला हवे. असे वक्तव्य शेवगाव येथील दिवाणी न्यायालयाच्या न्यायाधीश मा. संजना जगुष्टे यांनी केले. उचल फौंडेशन या संस्थेने नुकतेच मुंबईस्थित स्नेहालय संस्थेचे विश्वस्त श्री. अरुण शेठ यांच्या देणगी सहयोगातून उभारण्यात आलेल्या अरुणोदय भवन या वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्यांनी आपल्या जिवलग मैत्रिणीचे उदाहरण दिले. जी स्वतः एक ऊसतोडणी कामगाराची मुलगी असूनही आईवडिलांनी शैक्षणिक प्रवाहात ठेवल्याने जिद्दीने शिक्षण घेत आज एक न्यायाधीश बनली आहे. संस्थेचे कार्य व येथील विद्यार्थ्यांकडे पाहून मला या मुलांचे उज्वल भविष्य दिसत आहे. कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय केवळ लोकसहभागातून चालवल्या जाणाऱ्या या कार्यास आपण एक सामाजिक बांधिलकी म्हणून इथे आपले अनमोल योगदान द्यायला हवे. आणि याच भावनेतून आपण या उपक्रमास शुभेच्छा देण्यास उपस्थित आहोत असे त्या म्हणाल्या.
अरुणोदय भवन या वस्तूचे उद्घाटन बांगलादेश येथील गांधी आश्रम ट्रस्टचे सचिव व जमनलाल बजाज आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार प्राप्त श्री. राह नबा कुमार यांच्या हस्ते म. गांधीजींची प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. या कार्यक्रमास राह नबा कुमार हे त्यांच्या सुविद्य पत्नी तंन्द्रा बरुआ व आपल्या दोन्ही मुलांसह उपस्थित होते.
राह नबा कुमार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की, स्नेहालयाचे संस्थापक डॉ.गिरीशजी कुलकर्णी तसेच शेवगाव येथील उचल फाउंडेशन परिवार अनाथ आणि इतर दुर्लक्षित वंचित मुलांसाठी जे कार्य करत आहे ते खूप महत्त्वाचे कार्य आहे. अश्या कामामुळेच ही मुले आपल्या स्वतःच्या पायावर उभी राहतील. वेगवेगळ्या क्षेत्रात यश मिळवतील. आणि यातूनच गांधीजींना अभिप्रेत असला नवयुवक घडेल. असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी उपस्थित स्नेहालयाचे कायदेशीर सल्लागार ऍड. श्याम असावा यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच जय जगत ' हे राष्ट्रीय एकात्मतेचे व महात्मा गांधीजींचा संदेश देणारे सामूहगीत गात सचिन खेडकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्तविक मांडले.
याप्रसंगी स्नेहालय आयोजित कोलकत्ता ते बांगलादेश (गांधी आश्रम-नौखाली) अशी 1500 कि.मी. आतंरराष्ट्रीय सद्भावना सायकल यात्रा यशस्वीरित्या पूर्ण करणारे श्री.भागनाथ काटे , डॉ संजय लढ्ढा , डॉ मनीषा लढ्ढा, सचिन खेडकर, प्रा.डॉ. गजानन लोंढे यांचा गांधी आश्रम ट्रस्टचे सेक्रेटरी राह नबा कुमार व न्या. संजना जागुष्टे यांच्या हस्ते सन्मानपत्र व मेडल देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी शेवगाव मधील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांनी गांधी आश्रम ट्रस्टचे सेक्रेटरी राह नबा कुमार यांचा सत्कार केला. यामध्ये इनरव्हील क्लब च्या अध्यक्षा भारती बाहेती, रोटरी क्लबचे अध्यक्ष मनीष शेठ बाहेती, शेवगाव सायकल असोसिएशनचे विनोद ठणगे व इतर सदस्यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गजानन लोंढे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजय लड्डा यांनी केले.
श्रीम. वसुधा सावरकर,सौ. मीनाक्षी शिंदे, सौ.वनिता डाके, सौ. सुजाता खेडकर ,ऍड. अभिजीत काकडे, प्रा. राम नेव्हल, यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. डॉ. दीपक वैद्य, श्री. वल्लभ लोहिया, डॉ. सुभाष बाहेती त्याचबरोबर रोटरी क्लब, फिरस्तासंघ, शेवगाव सायकल असोसिएशन व इनरव्हील क्लबचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा