ब्युरो टीम : लोकसभा निवडणूक तयारीच्या दृष्टीने शहर भारतीय जनता पक्षाकडून ‘बूथ चलो अभियान’ हाती घेण्यात येणार आहे. पुणे लोकसभा मतदारसंघातील २ हजार १० बूथवर चार फेब्रुवारी ते ११ फेब्रुवारी या कालावधीत अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत एका मतदारसंघातील कार्यकर्ता दुसऱ्या मतदारसंघातील बूथवर जाणार आहे. भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्याबाबतची माहिती सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सरचिटणीस पुनीत जोशी, रवींद्र साळेगावकर, सुभाष जंगले, राघवेंद्र मानकर, महेश पुंडे, संजय मयेकर ,पुष्कर तुळजापूरकर आणि हेमंत लेले यावेळी उपस्थित होते.
घाटे म्हणाले, पुणे लोकसभा मतदारसंघातील दोन हजार दहा बूथवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक बूथसाठी एक प्रवासी कार्यकर्त्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणुकीपर्यंत दर पंधरा दिवसांनी हा कार्यकर्ता बूथला भेट देणार आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारची विकासकामे, योजना या अभियानाअंतर्गत मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येतील
बूथ समितीची बैठक घेणे, बूथ समिती आणि पन्ना प्रमुख यांना त्यांच्यावरील जबाबदाऱ्या सोपवणे, नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीचा आढावा, समाजमाध्यमांचे गट करणे, विकसित भारतसाठी ब्रँड ॲबँसिडर बनविणे, प्रचार मोहिमेचा आढावा घेणे, प्रत्येक बूथवर ५१ टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळविण्याचे नियोजन करणे, ज्येष्ठ कार्यकर्त्यांच्या भेटी घेणे, प्रभावशाली व्यक्तिंची भेट घेणे, लाभार्थ्यांशी संवाद साधणे, विविध समाज घटकांच्या बैठका घेणे अशाप्रकारची कामे या अभियानातून करण्यात येणार आहेत. बूथ समितीची रचना पूर्ण झाली असून २०१० बूथ प्रमुख, ७३१ सुपर वाॅरियर्स, ४७२ शक्ती केंद्र प्रमुखांच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून निवडणुकीसाठी व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याचे घाटे यांनी स्पष्ट केले.
टिप्पणी पोस्ट करा