Chhagan Bhujbal : ‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त करण्याचा राज्य शासनाचा निर्णय; छगन भुजबळ यांनी केली होती मागणी

 

ब्युरो टीम : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या मागणीला यश मिळालं आहे. देशात स्त्री शिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांसाठी शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आभार मानले आहे. छगन भुजबळ यांनी सत्यशोधक चित्रपटाला करसवलत देण्यात यावी यासाठी शासनाकडे मागणी केली होती.

छगन भुजबळ यांच्या मागणीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सकारात्मक भूमिका घेत यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या सूचना केलेल्या होत्या. त्यानुसार बुधवारी मंत्रालयात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय होऊन सत्यशोधक चित्रपट करमुक्त करण्यात आला आहे. चित्रपटांवर आकारण्यात येणाऱ्या 18 टक्के जीएसटीपैकी प्रत्येकी 9 टक्के रक्कम केंद्र आणि राज्य शासनाला मिळत असते. राज्याच्या वाट्याला येणाऱ्या रकमेची करसवलत देण्याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

या निर्णयामुळे महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे कार्य अलौकिक कार्य भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी हा चित्रपट पहावा असं आवाहन मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. सत्यशोधक या चित्रपटात अभिनेता संदीप कुलकर्णी यांनी महात्मा फुलेंची भूमिका साकारली आहे. तर अभिनेत्री राजश्री देशपांडे ही सावित्रीबाईंच्या भूमिकेत आहे. याशिवाय गणेश यादव, सुरेश विश्वकर्मा, रविंद्र मंकणी यांच्याही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. 5 जानेवारी रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे.

‘सत्यशोधक’ या चित्रपटाचा प्रीमिअर नाशिकमध्ये पार पडला होता. त्यावेळी छगन भुजबळ प्रीमिअरला उपस्थित होते. “कुठल्याही धर्माच्या विरोधात महात्मा फुले यांचा लढा नव्हता. त्यांचं लढा ब्राम्हणांच्या विरुद्ध नव्हे तर ब्राम्हण्य वादाच्या विरोधात होता. जो पर्यंत आपण आपला हा इतिहास माहिती होत नाही तो पर्यंत आपल्याला समाज सुधारकांचे विचार आपल्याला तळागाळात पोहोचवता येणार नाही. त्यासाठी सत्यशोधक चित्रपट हा अतिशय प्रभावी आणि परिणामकारक असून महाराष्ट्र भरातील सर्वांनी हा चित्रपट पाहावा,” अशी प्रतिक्रिया त्यांनी त्यावेळी दिली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने