Cricket : अफगाणिस्तान विरुद्ध कॅप्टन रोहित शर्माला कोण देणार सलामीला साथ ; विराट सह अनेक पर्याय समोर

 

ब्युरो टीम : टीम इंडिया विरुद्ध अफगाणिनस्तान यांच्यातील टी 20 मालिकेला अवघे काही तास बाकी आहेत. या मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचं टेन्शन वाढलंय. अफगाणिस्तान विरुद्ध ओपनिंग कोणती जोडी करणार, असा प्रश्न टीम मॅनेजमेंटसमोर आहे. टीम इंडियाकडे 3 जोड्या आहेत, जे ओपनिंग करण्यासाठी तयार आहेत. मात्र तिघांपैकी कुणाला संधी द्यायची हा पेच आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध कॅप्टन रोहित शर्मा ओपनिंग करणार हे निश्चित आहे. मात्र त्याच्यासोबत साथ द्याला कोण येणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. रोहितसोबत येण्यासाठी तिघांमध्ये रस्सीखेच आहे. यामध्ये शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि विराट कोहली या तिघांची नावं आहेत. शुबमन रोहितसह गेल्या काही काळात सातत्याने सलामीला आला आहे. या दोघांमध्ये चांगला ताळमेल आहे.

दुसऱ्या बाजूला 14 महिन्यांनी विराट आणि रोहित टी 20 टीममध्ये परतले आहेत. अवघ्या काही महिन्यांवर टी 20 वर्ल्ड कप आहे. त्यामुळे रोहितसह विराट कोहली याने ओपनिंगला उतरावं, अशीही इच्छा आणि मागणी क्रिकेट चाहत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.


तर तिसरा आणि शेवटचा पर्याय म्हणजे यशस्वी जयस्वाल. यशस्वीला टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण करुन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे यशस्वीच्या नावाची इतकी चर्चा नाही, मात्र तो आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो.

रोहित-विराट ओपनिंग जोडी

दरम्यान रोहित आणि विराट हे दोघे अनुभवी फलंदाज आणि आजी-माजी कर्णधार आहेत. त्यामुळे दोघांना खेळाडू आणि कर्णधार असा प्रदीर्घ आणि तगडा अनुभव आहे. या दोघांनी आतापर्यंत टीम इंडियासाठी टी 20 क्रिकेटमध्ये 29 सामन्यांमध्ये ओपनिंग केली आहे. या दरम्यान दोघांनी 40 च्या सरासरीने 1 हजार 160 धावा केल्या आहेत. तसेच या दोघांनी 138 धावांची भागीदारीही केली आहे. आता टीम मॅनेजमेंट कोणाच्या नावाला ओपनर म्हणून पसंती देतं, हे अवघ्या काही तासातच स्पष्ट होईल.

अफगाणिस्तान विरुद्धच्या टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , आवेश खान आणि मुकेश कुमार.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने