Devendra Fadanvis : आमचे सरकार आज आहे, उद्याही राहणार; आमदार अपत्रातेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

 

ब्युरो टीम : आमदार अपात्रेतेप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर योग्य निर्णय घेतील. राज्यात महायुती सरकार आजही आहे आणि उद्याही ते स्थीर राहणार, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. संत जगनाडे महाराज पुण्यातिथी कार्यक्रमाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

शिवसेनेमध्ये फूट पडून झालेल्या सत्तांतरानंतर विधानसभा अध्यक्षांपुढे सुनावणी झाली. या प्रकरणाचा निकाल बुधवारी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे जाहीर करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटातील १६ आमदारांचे राजकीय भवितव्य ठरवणारा हा निकाल आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे अतिशय कायदेशीर अशा प्रकारचे सरकार आम्ही तयार केले आहे. त्यामुळे आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे की अध्यक्षाच्या निकालानंतर आम्हाला शंभर टक्के न्याय मिळणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थीर असून सरकार कालही स्थीर होते आणि उद्याही ते स्थीर राहणार आहे, असा पूर्ण विश्वास मला असल्याचे फडणवीस म्हणाले. निकाल एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होईल त्यामुळे सरकारला कुठलाही धोका नाही, असेही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी आमदार अपत्रातेप्रकरणी एकनाथ शिंदेंच्या गटाला न्याय मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान राहुल नार्वेकर यांनी वर्षावर जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. त्यामुळे राहुल नार्वेकर यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला तोंड फुटले होते, त्यामुळे उद्याच्या निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने