ब्युरो टीम : तुम्ही वाहन वापरत असल्यास पेट्रोल-डिझेल भरुन घ्या. कारण राज्यात येत्या दोन, तीन दिवसांत पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यातील टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. यामुळे पेट्रोल-डिझेलची टंचाई निर्माण होणार आहे. केंद्र सरकारकडून नवीन मोटार वाहन कायदा आणला जात आहे. या कायद्यास देशभरातील ट्रक चालकांनी विरोध केला आहे. यामुळे देशभरातील ट्रकचालक आजपासून संपावर गेले आहेत. त्याला महाराष्ट्रातील टँकरचालक सहभागी झाले आहेत. आजपासून तीन दिवस असणाऱ्या या संपामुळे मुंबई अहमदाबाद महामार्गावर सकाळपासून 10 ते 15 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे महामार्गावरुन जाणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागले.
तिन्ही कंपन्यांच्या टँकर चालकांकडून आंदोलन
नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात विरोध होत आहे. या कायद्याच्या विरोधात टँकरचालकांनी थेट संपाची हाक दिली आहे. हा नवीन कायदा रद्द करा, अशी मागणी करत बीपीसीएल, एचपीसीएल आणि इंडियन ऑइल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल-डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकरचालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. आज घोडबंदर येथील फाऊन्टन हॅाटेलजवळ ट्रक चालकांनी चक्का जाम आंदोलन केले आहे. त्यामुळे तेथे वाहतूक कोंडी झाली आहे. वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत आहे.
काय आहे केंद्राचा नवीन कायदा
नवीन मोटार वाहन कायद्यात अपघातास ट्रकचालकाला जबाबदार धरले जाणार आहे. या कायद्यानुसार दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच सात लाख रुपये दंड करण्यात येणार आहे. यामुळे नवीन मोटार वाहन कायद्याला देशभरात ट्रक आणि टँकर चालकांनी विरोध केला. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी पेट्रोलियम कंपन्यांच्या टँकरचालकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. देशभरात विविध ठिकाणी सोमवारी आंदोलन करण्यात आले. मनमाड डेपोतून एकही टँकर बाहेर पडले नाही. यामुळे मनमाड डेपोतून इंधन वाहतूक ठप्प झाली आहे. टँकर चालकांचा हा संप मिटला नाही तर राज्यात पेट्रोल-डिझेल टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा