ब्युरो टीम; महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात मोठमोठे भूकंप घडणार असल्याचं भाकीत भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन वर्तवत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावर निकाल दिला तेव्हा गिरीश महाजन यांनी आगामी काळात राजकारणात मोठे भूकंप घडणार असल्याचं भाकीत वर्तवलं होतं. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी तसेच संकेत वर्तवले आहेत. त्यामागील कारणही अगदी तसंच आहे. कारण जळगावमधील काँग्रेसचे प्रसिद्ध नेते आणि माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्याविरोधात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सहा वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता उल्हास पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. उल्हास पाटील यांचा उद्या बुधवारी मुंबईत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडेल, अशी चर्चा सुरु आहे. उल्हास पाटील यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर उत्तर देताना गिरीश महाजन यांनी मोठं भाकीत वर्तवलं आहे.
“उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाबद्दल माहिती नाही. हा भूकंप कसा होतो ते माहीत नाही. मात्र मी बोललो होतो त्या पद्धतीने सर्वात मोठे भूकंप म्हणजे तुम्हाला अपेक्षित नसतील असे मोठे राजकीय भूकंप हे पुन्हा महाराष्ट्रात होणार आहेत”, असे सूचक संकेत भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. गिरीश महाजन यांनी याआधीही तसे संकेत दिले आहेत. त्यानंतर महाराष्ट्राच्या नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसावा तशा घटनाही घडल्या आहेत. सर्वात पहिली घटना म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात बंड पुकारुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली, दुसरी घटना म्हणजे सत्तांतरानंतर वर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात 40 आमदारांचा मोठा गट सत्तेत सहभागी झाला.
गिरीश महाजन यांचं भाकीत खरं ठरणार?
राज्यातील दोन विरोधी पक्षांत मोठी फूट पडली आहे. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातही मोठी फूट पडेल, अशा चर्चा सातत्याने होत आहेत, किंवा तशा चर्चा मुद्दामून राजकीय वर्तुळात घडवून आणल्या जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप होणार, असा दावा गिरीश महाजन यांनी केला आहे. या दरम्यानच्या काळात काही काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांची देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा समोर आली. पण त्या नेत्यांनी संबंधित दावे तात्काळ फेटाळले आहेत. तरीदेखील उल्हास पाटील सारख्या दिग्गज नेत्यांनं भाजपात जाणं हे काँग्रेसला जळगावात मोठं खिंडार पडण्यासारखंच आहे. त्यामुळे आगामी काळात गिरीश महाजन यांचं भाकीत खरं ठरतं की काँग्रेस एकसंघ राहण्यात यशस्वी होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.
जळगावातील मुळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानावर तब्बल 15 हजार स्क्वेअर फुट जागेवर प्रभू श्री रामचंद्र आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भव्य रांगोळी साकारण्यात आली. या ठिकाणी मंत्री गिरीश महाजन यांनी भेट दिली होती. यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप घडणार असल्याचं भाकीत वर्तवलं.
Hech karat basa. Tumhala amhi mat det nahi
उत्तर द्याहटवाटिप्पणी पोस्ट करा