Goa : गोव्यात पंचतारांकित हॉटेल उभारण्याचा प्रस्ताव; या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांच्या 17 हजार तक्रारी

 

ब्युरो टीम ; गोव्यात सध्या एका पंचतारांकित हॉटेल प्रकल्पाच्या विरोधात मोठी मोहीम उघडण्यात आली आहे. सेव्ह ओल्ड गोवा अॅक्शन कमिटीने ही मोहीम हाती घेतली आहे. या प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांच्या 17 हजार तक्रारी आयपीबीला देण्यता आल्या. त्यानंतरही या पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे. नागरिकांचा रोष असताना हा प्रकल्प का राबवला जात आहे? या प्रकल्पाला मंजुरी कशी देण्यात आली? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

माऊंट मेरी चॅपलजवळ प्रस्तावित बफर झोनजवळच पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प उभारला जात आहे. त्याला स्थानिकांसह सेव्ह ओल्ड गोवा कमिटीने विरोध केला आहे.  22 ऑक्टोबर 2023 रोजी आयपीबी बोर्डाने एक नोटीस पाठवली होती. यावेळी बोर्डाने 30 दिवसात प्रकल्पाबाबत हरकती आणि सूचना पाठवण्यास सांगितलं होतं. त्यानुसार स्थानिक नागरिकांनी आपल्या हरकती आणि सूचना दिल्या. एकूण 17 हजार तक्रारी देण्यात आल्या. त्यानंतर 22 डिसेंबर 2023 रोजी बोर्डाची बैठक झाली आणि हॉटेल प्रकल्पाला अंतिमरुप देण्यात आलं. तसेच हा प्रकल्प रद्द करण्याबाबतचं कोणतंही आश्वासन किंवा कारण दिलं गेलं नाही.

आरटीआय टाकूनही माहिती नाही

त्यापूर्वी म्हणजे 13 ऑक्टोबर 2023 रोजी सेव्ह ओल्ड गोवा कृती समितीने आरटीआयमधून माहिती मागवली होती. समितीने या प्रकल्पाची पूर्ण माहिती मागवली होती. मात्र, माहितीच्या अधिकारातून माहिती मागवूनही त्यावर अद्याप उत्तर देण्यात आलेलं नाही. समितीचे समन्वयक पीटर वीगास यांनी माहितीच्या अधिकारातून माहिती न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. अवर लेडी ऑफ द माऊंट चॅपल हे एक ऐतिहासिक स्थळ आहे. हे स्थळ दुरुस्तीच्या कारणास्तव नाही तर या ऐतिहासिक वास्तूच्या परिसरात प्रकल्प उभे करण्यात येणार होते म्हणून ते बंद करण्यात आलं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

जर कोणतंही काम होत नसेल तर एक वर्षासाठी चर्चचा जनतेशी का संबंध तोडला जात आहे? पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या चर्चचं पहिल्या टप्प्याचं काम करण्यात आलं आहे. या चर्चच्या पहिल्या टप्प्याचं काम करण्यासाठी 1.17 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. छताची दुरुस्ती करण्यासाठी सागाच्या लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे. पण प्रत्यक्षात केवळ प्लास्टर करण्यात आलं असून त्यावर सफेद रंग मारण्यात आल्याचा आरोप वीगास यांनी केला आहे.

मास्टर प्लान तयार करा

चर्चच्या सौंदर्यीकरणाचा दुसरा टप्पा आगामी आर्थिक वर्षावर आधारीत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. तर, सरकारने हा प्रकल्प रद्द करावा आणि जुन्या गोव्यासाठी सरकारने एक व्यापक मास्टर प्लान तयार करावा, अशी मागणी सेव्ह ओल्ड गोवा कृती समितीचे सचिव फ्रेडी डायस यांनी केली आहे. या प्रकल्पाच्या 10 हजार वर्ग मीटर परिसरात झाडे असून उतरंडीच्या भागात आणि वारसा क्षेत्रात बफर झोन असल्याचा दावा करत बोर्डाच्या सदस्यांच्या अभ्यासावरच फ्रेडी डायस यांनी सवाल केला आहे. हा परिसर रहिवाशी परिसर नाही. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याबाबत कोणताच निर्णय घेतला नाही ही आश्चर्याची बाब आहे, असंही ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने