Hasan Mushrif : जाहीर व्यासपीठावर मंत्री हसन मुश्रीफ यांना रडू कोसळले; कोल्हापुरात अजित पवारयांच्या समोर घडला प्रकार

 

ब्युरो टीम : राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्यक मंत्री हसन मुश्रीफ यांना आज भर मंचावर रडू कोसळलं. ते आज खूप भावूक झाले. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते आज कोल्हापूरमधील मौजे सांगाव गावात विविध विकास कामाचं उद्घाटन झालं. यावेळी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले. अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी होण्यापूर्वी हसन मुश्रीफ यांना मधल्याकाळात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. त्यांच्याविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरु होती. ईडीने मुश्रीफ यांच्या घरी छापा टाकला होता. त्यामुळे ते प्रचंड अडचणीत आले होते. त्यानंतर आता मुश्रीफ हे अजित पवारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत. ते सध्या कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत. अजित पवार यांनी दिलेल्या संधीमुळे आपण जिल्ह्याचे पालकमंत्री झालो. तसेच मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला, नागरिकांनी आपल्याला सातत्याने पाठिंबा दिला त्यामुळे आपण संकटातून सुखरुप बाहेर पडलो, अशा भावना व्यक्त करत असताना हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले.

“अजित पवार यांनी घेतलेली भूमिका योग्य आहे. अचानक एक राजकीय भूकंप ऑगस्ट महिन्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार वाढवण्यासाठी ही भूमिका घ्यावी लागली. ही भूमिका घेतल्यानंतर मतदारसंघातील जनतेने मला समजून घेतलं. अजितदादांनी आजपर्यंत अनेकवेळा मंत्रिमंडळात संधी दिली. पण कोल्हापूरचा पालकमंत्री होता आलं नव्हतं. तीसुद्धा संधी दादांनी दिली. मी शब्द देतो… महायुतीमधील एकाही पक्षाची तक्रार येणार नाही आणि विकासाच्या बाबतीत सुद्धा कोल्हापूरला मागे ठेवणार नाही”, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

“अंबाबाई मंदिर विकास आराखडा आपण येत्या बजेटमध्ये मंजूर करु. दादा आप आए बहार आयी है. प्रोत्साहन पर अनुदानामध्ये तांत्रिक अडचणी आल्या आहेत, ज्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत. या योजनेबाबत एक बैठक घेण्याची गरज आहे”, असं मुश्रीफ म्हणाले.

…आणि मुश्रीफांना रडू कोसळलं

“तुमच्याच ताकदीवर अनेक संकट पेलून मी उभा आहे. या जनतेचा मी आभारी आहे. राजकीय जीवनात दोन मोठी संकट माझ्यावर आली. या काळातही जनताच माझ्यासोबत राहिली”, असं म्हणत असतानाच मुश्रीफांना अश्रू अनावर झाले. त्यांना रडू कोसळलं. “मला आजपर्यंत जी खाती मिळाली त्यात ऐतिहासिक काम करण्याचं भाग्य मला मिळालं”, असंदेखील मुश्रीफ यावेळी म्हणाले.

‘आम्ही सत्तेसाठी हापापलेले नाही’, अजित पवार यांचं वक्तव्य

“आम्ही सत्तेसाठी हापापलेले नाहीत. सत्तेचा ताम्रपट घेऊन कोणीच जन्माला आलेलं नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक क्षेत्रात विकासकामे करत आहेत. त्यांच्या तोडीचं पुढे आता कोणीच दिसत नाही. मोदी ज्याप्रमाणे देशभर विकास करत आहेत तशीच कामे आपल्याला राज्यात चांद्यापासून बांद्यापर्यंत करायचा आहे. त्यासाठी सत्ता आवश्यक असते. काम करतो, झाली पाहिजेत असं म्हणून काम होत नाहीत. सत्तेत असल्याशिवाय वजन पडत नाही, अधिकारवाणीने आपण काम करून घेऊ शकत नाही”, असं अजित पवार यावेळी म्हणाले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने