ब्युरो टीम: लोकसभा निवडणुकीसाठी INDI Alliance मध्ये जागावाटपावरुन जोरदार चर्चा सुरु आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत महाराष्ट्रातील 48 पैकी 40 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव सेना आणि काँग्रेसमध्ये सहमती झाली आहे, तर 8 जागांवर अजुन देखील चर्चा अडकली आहे. या 8 जागांमध्ये दक्षिण मुंबईच्या प्रतिष्ठेच्या जागेचाही समावेश आहे. यावर उद्धव सेना आणि काँग्रेस दोन्ही पक्ष दावे करत आहेत.
काँग्रेसने स्थापन केलेल्या आघाडी समितीचे अध्यक्ष मुकुल वासनिक यांच्या घरी झालेल्या बैठकीला उद्धवसेना, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचे आणि सपाचे नेते उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसकडून सलमान खुर्शीद, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, मोहन प्रकाश हेही सहभागी झाले होते. महाराष्ट्रात सेना आणि काँग्रेसला 18 ते 20 जागा मिळू शकतात, असे महाराष्ट्रातील नेत्यांचे म्हणणे आहे. तर राष्ट्रवादीला केवळ 8 ते 10 वर समाधान मानावे लागेल अशी चिन्हे आहेत. खुद्द शरद पवारही यांनीही मैदानी ताकदीच्या आधारावर जागा निश्चित केल्या जातील, असे मंगळवारीच सांगितले होते.
जागावाटपाबाबत काँग्रेसचे म्हणणे आहे की, महाराष्ट्रातील हा एकमेव पक्ष आहे की ज्याचे विभाजन झाले नाही. अशा स्थितीत आम्ही जास्तीत जास्त जागांसाठी प्रबळ दावेदार आहोत. शरद पवार यांनीही एकप्रकारे काँग्रेसच्या दाव्याला दुजोरा देत हा मोठा पक्ष असून जास्त जागा मागू शकतो, असे सांगितले होते. या तीन पक्षांव्यतिरिक्त महाविकास आघाडी वंचित बहुजन आघाडीला दोन जागा देऊ शकते. राजू शेट्टींच्या स्वाभिमान पक्षालाही जागा मिळू शकते.
कालच्या बैठकी नंतर उद्धव सेनेचे नेते संजय राऊत यांनीही करारावर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत दिले आहेत. बैठकी नंतर ते म्हणाले, 'सर्व आघाडीचे नेते हसत हसत सभेतून बाहेर पडल्याचे तुम्ही पाहिले असेल. याचा अर्थ काय आहे ते तुम्ही ठरवू शकता. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते यांच्यात चर्चा झाली आणि आम्ही जागावाटपासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी नाना पटोले, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात हेही उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा