ब्युरो टीम : तुमच्या कुटुंबातील विधवांना हळदीकुंकवासारख्या शुभकार्यात बोलावले जाते का? कुत्रा किंवा माकड चावले, कावीळ झाली तर कुणाकडे उपचार घेता? घरात पाणी कोण भरते? मानसिक आरोग्यावर उपचार घेता का? विधवा स्त्रिया औक्षण करू शकतात का? इतकेच नाही, तर तुम्ही तुम्ही आंघोळ कुठे करता? यासारख्या अनपेक्षित प्रश्नांसह सुमारे १५० प्रश्नांची सरबत्ती मराठा सर्वेक्षणात केली जात आहे. काही प्रश्नांची उत्तरे सावधपणे दिली जात असल्याचा प्रत्यय घरोघरी जाणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना येतो आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव गुरुवारी (दि. २५) मुंबईच्या वेशीवर पोहोचत आहेत. मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या मनोज जरांगे यांनी मोर्चा आटोपता घ्यावा, यासाठी सरकार प्रयत्न करीत असले तरी त्यास यश येताना दिसत नाही. राज्य मागासवर्ग आयोगाच्या मदतीने तातडीने मराठा समाजाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्वेक्षणाला मंगळवारी (दि. २३) सुरुवात झाली. मात्र, काही ठिकाणी अॅप काम करीत नसल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना आला. काहींचा मोबाइल क्रमांक दुसऱ्या दिवशीही राज्य मागास आयोगाकडे रजिस्टर न झाल्याने त्यांना प्रत्यक्ष काम सुरू करता आलेले नाही. मात्र, काही कर्मचाऱ्यांनी सर्वेक्षणाचे काम सुरू केले असून, मराठा कुटुंबांमध्ये जाऊन माहिती भरून घेतली जाते आहे. विशिष्ट अॅपवर माहिती भरण्याचे निर्देश आयोगाने दिले असून, एका मराठा कुटुंबाकडील माहिती त्यामध्ये फीड करण्यास किमान २० ते २५ मिनिटे लागत असल्याचा अनुभव कर्मचाऱ्यांना येतो आहे. त्यामुळे दिवसभरात एक कर्मचारी फार तर १५ ते २० कुटुंबांचेच सर्वेक्षण पूर्ण करीत आहे.
केवळ नावाची अन् जातीची नोंद
मराठा समाजाची माहिती संकलित करण्यासाठी १४८ प्रश्न तयार करण्यात आले आहेत. संबंधित कुटुंबाची पार्श्वभूमी लक्षात यावी, विचारसरणी, दिनक्रम, राहणीमानाचा दर्जा, आर्थिक क्षमता लक्षात यावा असे प्रश्न या प्रश्नावलीतून विचारण्यात आले आहेत. संबंधित कुटुंब कोणत्याही जातीचे असो, सर्वेक्षणात त्याची माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मराठा नसलेल्या अन्य प्रवर्गांतील कुटुंबप्रमुखाचे नाव, जात, प्रवर्ग याची माहिती भरून घेतली जात आहे. ही माहिती भरण्यासाठी जास्तीत जास्त पाच मिनिटांचा कालावधी लागतो, अशी माहिती सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकांनी दिली.
एका सर्व्हेसाठी २० ते २५ मिनिटे
मराठा सर्वेक्षणासाठी जिल्ह्यात ११ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांकडून मंगळवारपासून सर्वेक्षण सुरू झाले. सर्व्हे करणाऱ्यांच्या अनुभवानुसार, एकेका कुटुंबाची माहिती भरण्यासाठी किमान २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागत आहे, तर मराठेतर कुटुंबांची माहिती नोंदवायला पाचते सात मिनिटे लागतात. हे सर्वेक्षण ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा ताण कर्मचाऱ्यांवर आहे.
---
अशी आहे प्रश्नावली?
कोणत्या प्रकारची बचत अथवा गुंतवणूक करता?
कुटुंबाचे मुख्य उत्पन्नाचे स्रोत किती व कोणते?
कुटुंबाचे एकूण उत्पन्न किती?
घरात पाणी कोण भरते?
घरात स्नानगृह नसेल तर आंघोळीसाठी कुठे जाता?
बँकेत काही तारण / गहाण ठेवलेय का?
बँकेने मालमत्ता ताब्यात घेतली का?
बँकेने कर्ज नाकारले आहे का? का नाकारले?
पंधरा वर्षांत काही स्थावर मालमत्ता खरेदी केलीय का?
तुम्ही बचत/ गुंतवणूक करता का?
कोणत्या प्रकारची गुंतवणूक करता?
कुटुंबातील महिला इतरांकडे धुणीभांडी करतात का?
घरात फ्रीज, वॉशिंग मशिन, कम्प्युटर, कार, एअर कंडिशनर, इंटरनेट कनेक्शन आहे का?
सरकारी योजनांचा लाभ घेतला आहे का?
घरातील विधवांना कुंकू लावण्याची, मंगळसूत्र घालण्याची परवानगी आहे का?
विधवा महिला औक्षण करू शकतात का?
विधुर पुरुषांचे, विधवा महिलांचे पुनर्विवाह होतात का?
स्त्रियांनी डोक्यावर पदर घेतला पाहिजे, असे बंधन आहे का?
मुलींचे लग्न साधारण कोणत्या वयात केले जाते?
मुलांचे लग्न उशिरा होण्याची कारणे?
कुणाचा आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह झाला आहे का?
जागरण गोंधळ किंवा अन्य विधीसाठी कोंबडा, बकऱ्याचा बळी देता का?
पहिले अपत्य मुलगाच झाला पाहिजे, अशी मानसिकता आहे का?
आजारी व्यक्तीची दृष्ट काढणे, अंगारा लावणे, गंडा बांधणे असे प्रकार करतात काय?
कुटुंबात दहा वर्षांत कुणी आत्महत्या केली आहे का? असेल तर कारण काय?
कावीळ झाल्यास उपचार कुणाकडे घेता?
घटकनिहाय प्रश्नसंख्या
शैक्षणिक : १८
कुटुंबाची सामाजिक स्थिती : १३
अपंगत्वाबाबत : ०२
मालमत्ता : १२
रोजगार : १२
आरोग्य : ११
शेती : १०
स्नानगृह/ शौचालय : ७
पिण्याच्या पाण्याबाबतचे प्रश्न : ५
लग्नाबाबत : ५
गुंतवणूक/ उत्पन्न : ५
कर्ज : ५
पशुधन : ४
जात : २
टिप्पणी पोस्ट करा