ब्युरो टीम : सहावेळची वर्ल्ड चॅम्पियन आणि 2012 ची ऑलिम्पिक पदक विजेती मेरी कॉमने बुधवारी बॉक्सिंगमधून निवृत्तीची घोषणा केली. अजूनही मला उच्चस्तरावर बॉक्सिंग खेळण्याची इच्छा आहे, असं 41 वर्षीय मेरी कॉमने सांगितलं. पण आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग फेडरेशनच्या नियमानुसार अशी परवानगी मिळत नाही. त्यामुळे तिने रिटायर होण्याचा निर्णय घेतला. IBA च्या नियमानुसार, 40 आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या एथलीट्सना व्यावसायिक बॉक्सिंग टुर्नामेंटमध्ये खेळण्याची परवानगी नाहीय.
मेरी कॉमने विश्व एमेच्योर बॉक्सिंग चॅम्पियनशिपचा किताब सहावेळा जिंकलाय. असा रेकॉर्ड करणारी ती जगातील एकमेव महिला बॉक्सर आहे. सात विश्व चॅम्पियनशिपमध्ये प्रत्येकवेळी पदक जिंकणारी ती एकमेव महिला बॉक्सर आहे.
‘मेरी कॉम’च्या जीवनावर चित्रपट
वर्ष 2018 मध्ये मणिपूर सरकारने असामान्य कामगिरीसाठी मेरी कॉमला ‘मीथोई लीमा’ पुरस्काराने सन्मानित केलं होतं. पद्म भूषण, पद्मश्री, अर्जुन पुरस्कार आणि अन्य काही पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे. मेरी कॉमच्या जीवनावर आधारित ‘मेरी कॉम’ फिल्म 2014 मध्ये रिलीज झाली. यात प्रियांका चोप्राने मेरी कॉमची भूमिका निभावली होती.
अशी कामगिरी करणारी ती एकमेव महिला बॉक्सर
2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कॉमने फ्लायवेट 51 किलोग्राम वर्ग गटात पदक जिंकलेलं. 2014 मध्ये दक्षिण कोरियात इंचियोन येथे एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. 2018 मध्ये राष्ट्रकुलमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पहिली महिला बॉक्सर आहे.
मेडल जिंकल्यानंतर मुलाला जन्म
2012 मध्ये ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर मेरी कॉमने आपल्या तिसऱ्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर तिने पुन्हा एकदा ब्रेक घेतला. त्यानंतर तिने पुनरागमन केलं. दिल्लीत 2018 मध्ये आयोजित वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मेरीने युक्रेनच्या हन्ना ओखोटावर 5-0 ने विजय मिळवला.
टिप्पणी पोस्ट करा