Nirmla Sitaraman : 1 फेब्रुवारीला होणार अंतरिम बजेट सादर; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण करणार विक्रम

 

 

ब्युरो टीम : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारी रोजी सहाव्यांदा बजेट सादर करतील. यंदा त्या अंतरिम बजेट सादर करतील. कारण लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सरकार या अंतरिम बजेटमध्ये खर्चाची तरतूद करेल. तर नवीन सत्ताधारी पूर्ण बजेट सादर करतील. सलग पाच पूर्ण बजेट सादर करणाऱ्या आणि एक अंतरिम बजेट सादर करणाऱ्या सीतारमण या देशातील दुसऱ्या अर्थमंत्री ठरणार आहे. यापूर्वी हा विक्रम माजी प्रधानमंत्री मोरारजी देसाई यांच्या नावे होता.

पाच वर्षांचे बजेट

सीतारमण या 1 फेब्रुवारी रोजी अंतरिम बजेट सादर करतील. त्या मनमोहन सिंह, अरुण जेटली, पी. चिंदबरम आणि यशवंत सिन्हा या माजी अर्थमंत्र्यांचा रेकॉर्ड पण त्या मागे टाकतील. या सर्व अर्थमंत्र्यांनी पाच वर्षांचे बजेट सादर केले होते. माजी केंद्रीय अर्थमंत्री देसाई यांनी 1959-1964 मधील पाच वर्षांचे बजेट आणि एक अंतरिम बजेट सादर केले होते. एप्रिल-मे महिन्यात सर्वसाधारण लोकसभा निवडणुका होणार आहे. त्यानंतर पूर्ण बजेट सादर करण्यात येईल.

बजेट सादर करणारी पहिली महिला

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1970-71 मध्ये केंद्रीय बजेट सादर केले. अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या देशाच्या पहिल्या महिला आहेत. त्यांनी तत्कालीन अर्थमंत्री मोरारजी देसाई यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावेळी त्या पंतप्रधान होत्या. पहिल्या महिला पंतप्रधान आणि पहिल्या महिला अर्थमंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले. 1971 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी अर्थमंत्रालयाचा कारभार हाती घेईपर्यंत त्यांनी काही काळ या पदावर काम पाहिले.

सर्वात दीर्घ भाषणाचा विक्रम

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या नावावर अजून एक खिताब आहे. केंद्रीय बजेट 2020 मध्ये त्यांनी दीर्घ भाषण केले होते. 2 तास 42 मिनिटांचे हे भाषण होते. तर गेल्यावर्षी त्यांनी जवळपास 1.5 तास अर्थसंकल्पीय भाषण केले. आता मोदी सरकारचे हे अंतरिम बजेट आहे. या बजेटकडून सर्वसामान्यांना मोठ्या अपेक्षा असल्या तरी या बजेटकडून मोठ्या अपेक्षा न ठेवण्याची घोषणा त्यांनी यापूर्वीच केली आहे.

पेपरलेस बजेट

निर्मला सीतारमण या आर्थिक वर्ष 2024-25 चे अंतरिम बजेट 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत सादर करतील. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीचे हे बजेट महत्वाचे मानण्यात येत आहे. मागील तीन पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्पाप्रमाणेच हे अंतरिम बजेट सुद्धा पेपरलेस असेल. कोरोना काळापासून कागदविरहीत अर्थसंकल्पाची सुरुवात झाली आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने