ब्युरो टीम : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं विधान केलं आहे. आपल्याला मोठ्या ऑफर येत आहे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं.भाजपकडून निवडणूक लढवण्याची ऑफर दिली जात असल्याच्या मुद्द्यावर राजू शेट्टींनी प्रतिक्रिया परभणीत दिली. मला थेट नाही मात्र मध्यस्थाकडून मी केंद्रीय मंत्र्यांना भेटावं त्यांच्याकडून काम करून घ्यावीत. त्यांच्याशी जवळीक साधावी अशा प्रकारचे निरोप मला येत आहेत. मात्र मी कितीही मोठी ऑफर आली तरी तिला हुरळून जाणारा कार्यकर्ता नाही, असं राजू शेट्टी म्हणालेत.
“मी हुरळून जाणार नाही”
स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपसोबत जाण्याच्या बातम्या पेरल्या जात आहेत. प्रत्यक्ष माझ्याबरोबर कोणी अशी चर्चा केलेली नाही. अप्रत्यक्षपणे येऊन काही लोक दिल्लीला भेटण्याचा आग्रह करतात. आम्हाला यामध्ये कोणताही स्वार्थ नाही. जरी भाजपकडून अप्रत्यक्षपणे विचारणा होत असली तर आपण हुरळून जाणार नाही. आमच्या कार्यकारिणींने निर्णय घेतलेला आहे. आम्ही ना भाजप सोबत जाणार, ना महाविकास आघाडी सोबत जाणार. त्यामुळे आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवण्यावर ठाम आहोत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
कुणाची ऑफर स्विकारणार?
महाविकास आघाडीकडून काही ठिकाणी जागा सुटलाच्या चर्चा होतात. मात्र आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही फक्त शेतकरी चळवळीसाठीच काम करणार आहोत. आघाडीतून मत मागायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. आघाड्यांच्या जाहीरनाम्याशी लोक प्रामाणिकपणे राहत नाहीत. त्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी विरोधक अशा बातम्या पेरत असतील याची शक्यता आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
शेतीच्या धोरणांवर राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
शेतीचे धोरण कृषी भवनमध्ये बसून ठरतं. त्याला निती आयोगाचे काही लोक सल्ला देतात. त्या विद्वानांचा आणि शेतीचा, गावाचा काहीही संबंध नाही. त्यांनी या देशातील शेतकऱ्यांची स्थिती समजून घ्यायला हवी. 85 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. पंधरा टक्के शेतकरी फक्त जास्त शेती धारण केलेले आहेत. मात्र त्यांच्याकडेही जिरायती जमीन आहे. ती पिकत नाही. राहिलेले दोन तीन टक्के मोठे शेतकरी हे उद्योजक, राजकारणी, व्यापारी आहेत. त्यांच्यावर कर लावण्यापेक्षा त्यांच्याकडे इतर सीबीआय, इन्कम टॅक्स हे लावून माहिती घेतली पाहिजे, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं.
टिप्पणी पोस्ट करा