Ram Mandir : २२ जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी जाहीर; महायुती सरकारची घोषणा

 

ब्युरी टीम :  महाराष्ट्र सरकारने येत्या 22 जानेवारीला श्री रामलल्ला प्राण-प्रतिष्ठा दिवस म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं येत्या 22 जानेवारीला लोकार्पण होत आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिर लोकार्पणाच्या दिवशी अर्ध्या दिवसाची सरकारी सुट्टी जाहीर केली आहे. त्यानंतर काही राज्यांमध्ये पूर्ण दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गोवा, आसाम आणि ओडिशा या राज्यांमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्र सरकारने देखील तसाच निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र सरकारकडून देखील 22 जानेवारीला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राम मंदिल लोकार्पणाच्या कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावं या उद्देशाने ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील रामभक्तांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिराचा 22 जानेवारीचा लोकार्पणाचा दिवस हा दिवाळी म्हणून साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. या दिवशी देशभरात दीपावली साजरी करण्यात यावी, घरोघरी दिवे लावण्यात यावेत, दीपोत्सव साजरा करण्यात यावा, असं आवाहन मोदींनी केलं आहे. प्रभू श्रीराम लंका जिंकून 14 वर्षांचा वनवास करुन अयोध्येत परत आले होते तेव्हा अयोध्यावासीयांनी दिवाळी साजरी केली होती. अगदी तशाचप्रकारचं सेलिब्रेशन करण्याचं आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

अयोध्येत राम मंदिर लोकार्पणाचा भव्यदिव्य कार्यक्रम

अयोध्येत राम मंदिराचा लोकार्पणाचा कार्यक्रम हा अतिशय भव्यदिव्य असा असणार आहे. या कार्यक्रमाला देश-विदेशातील एकूण 6 हजार व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. यामध्ये सिनेकलाकार, आंतरराष्ट्रीय खेळाडू, विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांचा समावेश असणार आहे. हा सोहळा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक व्हावा यासाठी सरकारकडून सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून अयोध्येला सजवलं जात आहे. अयोध्येत त्यासाठी अतिशय जय्यत तयारी सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशी अयोध्येत येऊन गर्दी करु नये, असं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे काही नेत्यांकडून देशभरात ठिकठिकाणी राम मंदिराची प्रतिकृती बनवण्यात येत आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या लोकार्पणाच्या दिवशी रामभक्त अशा प्रतिकृतीच्या ठिकाणी जाऊन रामलल्लांचं दर्शन घेऊ शकणार आहेत. देशभरात रामभक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.






0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने