ब्युरो टीम : श्रीराम भक्तांची प्रतीक्षा अखेर संपली आणि डोळ्यांचे पारणे फेडणारे रामलल्लांचे मनोहारी रुप समोर आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य आणि ऐतिहासिक राम मंदिरात रामलल्लांची विधीवत पूजा करण्यात आली. ५०० वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर राम मंदिरात रामलल्लांची मूर्ती विराजमान झाली. पूजेवेळी रामलल्लांच्या गर्भगृहात पंतप्रधान मोदींसह सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होते.
रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली, त्यावेळी हेलिकॉप्टरमधून राम मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामाची विधीवत पूजा झाल्यानंतर आरती करण्यात आली.
अयोध्यानगरीत भक्तांचा महासागर उसळला होता. मात्र फक्त अयोध्याच नव्हे, तर अवघा देश 'राम'मय झाला आहे. महाराष्ट्रातही राम भक्तांनी राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा साजरा केला.
अयोध्येत विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली. उद्योगपती मुकेश अंबानी, अनिल अंबानी, अभिनेते अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, रजनीकांत, माधुरी दीक्षित, रणबीर कपूर, आलिया भट यांची उपस्थिती होती.
अयोध्येत २५ हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये केंद्रीय पोलिसांचाही समावेश आहे. विमानतळापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असणारा मार्ग ‘एसपीजी’च्या निरीक्षणाखाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा पथकाने (एनएसजी) मंदिर परिसराची पाहणी करून सुरक्षा व्यवस्था भक्कम असल्याची खात्री केली
टिप्पणी पोस्ट करा