ब्युरो टीम: आज भारत आपला ७५ वा प्रजासत्ताकदिन साजरा करतोय, आपली भारत भुमी ही बलिदानाची, त्यागाची भूमी म्हणून जगात ओळखली जाते. इंग्रजांच्या गुलामगिरीतुन मातृभूमि मुक्त करण्यासाठी अनेकांनी आपले बलीदान दिले. भारत भुमीत अनेक वीररत्न जन्मले ज्यांनी जगाला समता, बंधुता याचा आदर्श घालून दिला.
खरं तर बलाढ्य इंग्रजाना भारतातून हाकलून लावणे सोपे नव्हते पण मातृभुमीसाठी अनेकांनी आपले रक्त सांडवले. आज आम्ही भारतीय प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करतोय.आता हळूहळू काळ बदलत चाललाय तसा देश हि बदलतोय. एकीकडे भारत देश आर्थिक, सामजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत महासत्तेकडे वाटचाल करत आहे. हि बाब आम्हां सर्वच भारतीयांसाठी आभिमानाची गोष्ट आहे. पण दुसरीकडे देशात अनेक समस्या वाढताना दिसत आहेत. त्याग, बलिदान शब्द मागे पडून आता सत्या ऐवजी सत्ते साठी लढाई होताना दिसतेय. स्वार्थपोटी माणुसकी संपत चाललीय. एकेकाळी सोन्याचा धूर निघणाऱ्या देशात आता भष्ट्रचाराचा महापूर वाहताना दिसतोय.
देशात समता बंधुता नष्ट होवून जातीभेद, धर्मभेद वाढू लागलेत.कृषिप्रधान देश आता जातीप्रधान देश होतोय की काय अशी शंका मनात येवू लागलीय. युवक हा व्यसनाच्या आहारी जाताना दिसतोय. स्त्री भूणहत्या, महिलांवरील अत्याचार अशा घटना वाढताना दिसतात. युवक वर्ग गटातटात विभागले जावुन युवकांच्या हाती पुस्तका ऐवजी दगडे काठ्या दिल्या जातात. प्रचंड बेरोजगारी वाढत आहे. लोकसंख्यावाढीने अक्राळविक्राळ स्वरूप धारण केलेय. शेतकरी वर्ग कर्जापोटी आत्महत्या करताना दिसतायत. खरं तर आज भारत देश अनेक श्रेत्रात वेगाने प्रगती करत आहे. भारत हा विश्वगुरु होण्याच्या दिशेने वेगाने पाऊल टाकत आहे. पण अशा अनेक समस्या प्रगतीस अडथळा ठरु शकतात. भारताला महासत्ता बनवन्यासाठी व भारतीय तिरंगा ध्वज स्वाभिमानाने उंचच उंच फडकत ठेवण्यासाठी सर्वांनीच ऐक्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजातील भेदभाव नष्ट करून अनेक श्रेत्रात भरारी घेत भारताला पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघणारा देश बनवूया.प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा.
लेखक - प्रा. महेंद्र मिसाळ (प्रसिद्ध व्याख्याते)
टिप्पणी पोस्ट करा