ब्युरो टीम : लोकसभा सार्वत्रित निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशात शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कार्यकर्त्यांची एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजित करण्यात आली होती. आंबेगाव तालुक्यातील मंचरमध्ये ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी शिवसेनेचे उपनेते आणि आमदार सचिन अहिर, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यावेळी सचिन अहिर यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीवर भाष्य केलं. शिरूर लोकसभा मतदारसंघ सध्या चर्चेत आहे. अशातच सचिन अहिर यांनी या लोकसभेच्या जागेविषयी आणि उमेदवारीबाबत भाष्य केलं आहे.
“आमच्याकडे उमेदवार होता, पण…”
शिरूर लोकसभा नाही तर विधानसभा लढवण्याची आमची तयारी आहे. 18 महिन्यापूर्वी लोकसभेसाठी आमच्याकडे चांगला उमेदवार होता. पण काहींनी त्यांना गुळ लावला आणि ते इतरांना गुळ लावत आहेत, असं म्हणत सचिन अहिर यांनी आढळराव पाटलांवर निशाणा साधला. आम्ही नवीन चेहरा तयार करु शकतो. पण महाविकास आघाडी जो उमेदवार देईल त्याचं काम करणार आहोत. महायुतीचा पराभव आणि महाविकास आघाडीचा विजय हा आमचा अजेंडा आहे, असंही अहिर म्हणाले.
महायुतीवर निशाणा
काहींनी पाठ फिरवली तर काहींनी स्टेजवर पाठ बदली केलीय. महायुतीत कोण कुणाच्या पाटावर बसलंय हे समजायला तयार नाही. आमदारच बोलत असुन आम्ही कुणाच्या पाटावर बसायचे अशी अवस्था महायुतीत आहे. हे सर्व सत्तेसाठी एकत्र आलेत त्यांच्यात तत्वता नाही. आमच्यातही काहींनी गद्दारी केली. तरी आम्ही महाविकास आघाडी टिकवली, असंही सचिन अहिर म्हणाले.
मिलिंद देवरा यांच्या निर्णयावर म्हणाले…
मिलिंद देवरा यांनी काल काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरही सचिन अहिरांनी प्रतिक्रिया दिली आहे. मिलिंद देवरांच्या पक्षांतरामुळे महाविकास आघाडीला फरक पडणार नाही. मिलिंद देवरांनी आता निवडणूक लढवावी, असं ते म्हणाले. महाविकास आघाडीत जागा वाटपाची प्राथमिक चर्चा झाली आहे. आमचे दौरे आणि उमेदवारांच्या नावा सह घोषणा लवकर होईल, असंही अहिर म्हणाले.
टिप्पणी पोस्ट करा