Shahaji Bapu Patil : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना मतदारसंघात धक्का; विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर 'या' सूतगिरणीत निवडणुकीत पराभव

 

ब्युरो टीम : सांगोला तालुका महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूतगिरणीच्या निवडणुकीत सत्ताधारी शेकापने सर्व २१ जागा कायम राखत प्रतिस्पर्धी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार ॲड. शहाजीबापू पाटील गटाला धोबीपछाड दिली. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या सूतगिरणीत झालेल्या पराभवामुळे आमदार पाटील यांना धक्का बसला आहे.

या निवडणुकीत शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शेतकरी महिला विकास आघाडी पॕनेलला आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांनी स्वाभिमानी सूतगिरणी बचाव पॕनेलच्या माध्यमातून आव्हान दिले होते. सूतगिरणीचे संस्थापक गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर ही पहिलीच निवडणूक होती. सूतगिरणीचे सभासद सोलापूर जिल्ह्यासह पुणे, सांगली, सातारा व लातूर जिल्ह्यातही विखुरले आहेत. ही निवडणूक बिनविरोध होण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केलेले प्रयत्न व्यर्थ ठरले.

एकूण २३९० मतदारांपैकी १६३६ मतदारांनी मतदान केले होते. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांना धक्का बसला. त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. सत्ताधारी डॉ. देशमुख गटाचे सर्व २१ उमेदवारी निवडून आले.

कापूस उत्पादक गटातून (११ जागा) वंदना बाबर (८०१), शुभांगी पाटील (८०१), शालन हजारे (७९३), शोभा रसाळ (७९३), उज्ज्वला वाघमोडे (७९३), विमल बंडगर (७८९), शबाब खतीब (७८९), मालन पाटील (७८७), सुरेखा मदने (७८५), छाया कोळेकर (७७५), मायाक्का यमगर (७७५) या निवडून आल्या.

बिगर कापूस उत्पादक गटातून (५ जागा) प्रतिभा ढोबळे (२६८), नम्रता जोशी (२६७), द्रोपदी भगत (२६३), गोकुळाबाई मिसाळ (२६१), आनंदीबाई रूपनर (२६०) या विजयी झाल्या. तर अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून स्मिता बनसोडे (११४१), रतन बनसोडे (११५६) निवडून आल्या. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून राजश्री जाधव (११६०) विजयी झाल्या. संस्था प्रतिनिधी महिला मतदारसंघात उषा देशमुख आणि भटक्या-विमुक्त जाती-जमाती विशेष मागास महिला प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघात कल्पना शिंगाडे यांची बिनविरोध निवड झाली होती.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने