Sharad Pawar : कार्यकाळ अर्धवट सोडणार नाही; तो पर्यंत काम करत राहणार - शरद पवार

 

ब्युरो टीम :  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार अजूनही राजकारणात आहेत. वयाच्या 84 व्या वर्षीही शरद पवार प्रचंड अॅक्टिव्ह आहेत. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर टीका केली होती. वय झालं तरी ते निवृत्त होत नाहीत. कधी निवृत्त होणार? घरी बसावं ना. मार्गदर्शन करावं, असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. अजित पवार यांच्या या विधानावर शरद पवार यांनी खुद्द भाष्य केलं आहे. त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे. त्यावर मी बोलू इच्छित नाही, असं सांगतानाच माझ्या विरोधकांनीही कधी हा विषय काढला नाही, असा हल्लाच शरद पवार यांनी चढवला आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य करताना अजितदादा यांच्या टीकेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी काय बोलायचं यावर मी बोलू इच्छित नाही. वयाचा हिशोब काढणं त्यांना योग्य वाटत असेल तर ते बोलू शकतात. माझ्या बाबत विचार करायचा झाला तर मी 1967मध्ये संसदीय राजकारणात आलो. तेव्हापासून मी एकदाही ब्रेक घेतला नाही. संसद आणि विधानसभेत सातत्याने आहे. या काळात माझ्या सक्रियतेबाबत किंवा माझ्या कामाच्या पद्धतीबाबत माझ्या विरोधकांनीही कधी विषय काढला नाही, असं शरद पवार म्हणाले.

अशा गोष्टी काढणं योग्य नाही

वयाचा प्रश्न असेल तर मोरारजी देसाई हे सुद्धा ज्येष्ठ होते. ते काम करत होते. लोकं त्यांच्यासोबत होते. अनेक नेते वय वाढलं तरी सक्रिय होते. त्यामुळे अशा गोष्टी काढणं योग्य नाही. मी त्या खोलात जात नाही, असं शरद पवार म्हणाले.


राज्यसभेचा कार्यकाळ अर्धवट सोडू?

मी निवडणूक लढणार नाही हे मी जाहीरपणे सांगितलं आहे. त्यावरून काही दिशा स्पष्ट होतात. एकदा जाहीर केल्यानंतर पुन्हा तो मुद्दा काढण्याची गरज नाही. राज्यसभेचे माझे एक-दोनच वर्ष राहिली आहेत. ते अर्धवट सोडू का? मला माझ्या पक्षाने राज्यसभेत पाठवलं. ते अर्धवट सोडून कसं थांबू? मला लोकांना संसदेत पाठवलं आहे. जोपर्यंत माझा कार्यकाळ आहे, तोपर्यंत त्यांची सेवा करणं आणि सहकाऱ्यांना मदत करणं हे माझं काम आहे, ते मी करत राहील, असं त्यांनी स्पष्ट केलं.

अनेक क्षेत्रात काम करता येतं

निवृत्तीनंतर कोणत्या क्षेत्रात काम कराल? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काम करण्यासाठी मला अनेक क्षेत्र आहेत. साखर उद्योगात मी लाईफ मेंबर आहे. काही संस्थेत मी अजीवन सभासद आहे. शिक्षण संस्थेतही काम करता येतं. अनेक संस्थेत काम करता येतं. त्यामुळे सत्तेच्या राजकारणातच असलं पाहिजे असं नाही, असं पवार यांनी निवृत्तीच्या मुद्द्यावर भाष्य केलं.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने